Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरज चोप्रानं 5 मे (शुक्रवार) रोजी दोहा डायमंड लीगचं विजेतेपद पटकावलं आहे. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटरवर भाला फेकला. नीरजचा हा पहिला फेक स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो ठरला. दरम्यान, या स्पर्धेतही नीरज त्याच्या नव्या विक्रमापासून दूर राहिल्याचं पाहायला मिळालं. नीरज पुन्हा एकदा 900 मीटरचा अडथळा पार करण्यात अयशस्वी ठरला. 


टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा चेक खेळाडू जेकोब वडलेज्च दोहा डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सनं या स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं. गेल्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अँडरसन पीटर्सनं नीरज चोप्राचा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं होतं. दोहा डायमंड लीगमध्ये सुवर्ण कामगिरी करत नीरज चोप्रानं पीटर्सकडून मागील पराभवाचा बदला घेतला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.  


दोहा डायमंड लीगमधली नीरज चोप्राची कामगिरी : 



  • पहिला प्रयत्न : 88.67 मीटर

  • दुसरा प्रयत्न : 86.04 मीटर

  • तिसरा प्रयत्न : 85.47 मीटर 

  • चौथा प्रयत्न : फाउल 

  • पाचवा प्रयत्न : 84.37 मीटर

  • सहावा प्रयत्न : 86.52 मीटर




दोहा डायमंड लीगची फायनल स्टँडिंग 


1. निरज चोप्रा (भारत) : 88.67 मीटर
2. जॅकब वडलेज्च (चेक गणराज्य) : 88.63 मीटर
3. एंडरसन पीटर्स (ग्रेनाडा) : 85.88 मीटर
4. जुलियन वेबर (जर्मनी) : 82.62 मीटर 
5. एंड्रियन मर्डारे (मोल्डोवा) : 81.67 मीटर 
6. केशोर्न वाल्कॉट (त्रिनिदाद एंड टोबॅगो) : 81.27 मीटर 
7. रोड्रिक जी. डीन (जापान) : 79.44 मीटर 
8. कर्टिस थॉम्पसन (यूएसए) : 74.13 मीटर


डायमंड लीगची अंतिम फेरी यूजीनमध्ये 


दोहा येथे होणारा हा कार्यक्रम डायमंड लीग सीरिजचा पहिला टप्पा आहे. 16 आणि 17 सप्टेंबर रोजी यूजीनमध्ये डायमंड लीग फायनलसह या स्पर्धेचा समारोप होणार आहे. डायमंड लीगच्या एका लेगमध्ये प्रत्येक खेळाडूला पहिल्या क्रमांकासाठी 8, द्वितीय क्रमांकासाठी 7, तृतीय क्रमांकासाठी 6 आणि चौथ्या क्रमांकासाठी 5 गुण दिले जातात.


डायमंड लीग चॅम्पियन आहे, निरज चोप्रा 


निरज चोप्राची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी 89.94 मीटर आहे, जो राष्ट्रीय विक्रमही आहे. 2018 मध्ये दोहा डायमंड लीगमधील त्याच्या एकमेव सहभागामध्ये 2018 मध्ये 87.43m सह चौथे स्थान मिळवलं. 'एकूण फिटनेस आणि ताकद' नसल्यामुळे नीरज गेल्या वर्षी दोहा डायमंड लीगला मुकला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये झुरिचमध्ये (Zurich) 2022 ग्रँड फिनाले जिंकल्यानंतर डायमंड लीग चॅम्पियन बनणारा तो पहिला भारतीय ठरला. एक महिन्यापूर्वी, तो लुझने येथे डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता.