National Carrom Championship 2022 : महाराष्ट्राच्या संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या आकांक्षा उदय कदम (Aakanksha Kadam) हिने दिल्ली येथे झालेल्या 50 व्या वरिष्ठ नॅशनल कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत (National Carrom Championship 2022) दोन कांस्य पदकांची (Two Bronze medal) कमाई करत दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे. यावेळी रश्मी कुमारीने सुवर्ण तर के नागतोतीने रौप्य पदक मिळवलं आहे. 


संगमेश्वर तालुक्यातील मूळच्या देवडे गावची असणारी आकांक्षा अवघ्या 17 वर्षांची आहे. पण तिची भरारी वाखाणण्याजोगी आहे. सध्या ती वरिष्ठ पातळीवरील कॅरम स्पर्धांमध्ये भाग घेऊन चांगल्या चांगल्या खेळाडूंना मात देऊन आपले वर्चस्व सिद्ध करत आहे. विशेष म्हणजे आकांक्षा ही सिनिअर गटात खेळणारी सर्वात लहान खेळाडू म्हणून सहभागी झाली होती‌. ती सध्या केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अथॉरिटीकडून खेळाडू म्हणून खेळत असून तिने देशात वैयक्तिक कांस्य पदक मिळवल आहे. संघाला देखील कांस्य पदक मिळवून देण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे.


आकांक्षा हीने या स्पर्धेत उत्तर प्रदेशची ममता कुमारी, चंदीगडची सानीया, निधी गुप्ता कर्नाटकची शायनी तसेच महाराष्ट्राची नीलम या नावाजलेल्या कॅरम पट्टूंना पराभूत करून विजय मिळवला आहे. आकांक्षा ही एक आंतरराष्ट्रीय कॅरमपट्टू असून मालदीव येथे झालेल्या कॅरम स्पर्धेत तिने पदार्पणातच देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. त्यानंतर वाराणसी येथे झालेल्या कनिष्ठ गटाचीही ती विजेती आहे. मागील वर्षी वाराणसीत झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील (National Level Carrom Championships) वरिष्ठ कॅरम स्पर्धेत आकांक्षा आठव्या स्थानी होती. आजपर्यंत आकांक्षा हिने तब्बल सहा वेळा राज्यस्तरीय कॅरम स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे. तर दोन वेळा तिला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे.आतापर्यंत आकांक्षा ही ज्युनिअर गटातून सहा वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळली असून या स्पर्धेत तिला दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी सहा पदकं मिळाली आहेत. आकांक्षाने कमी वयात कॅरम खेळामध्ये चांगलीच चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे एका छोट्या खेड्यातून येऊनही आकांक्षाने कॅरममध्ये चांगली भरारी घेतली आहे. आकांक्षाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


हे देखील वाचा-