Sushma Andhare In Kolhapur : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा उद्या मंगळवारी कोल्हापूरमध्ये येत आहे. त्यांची कुरुंदवाडमध्ये जाहीर सभा होणार आहे. कुरुंदवाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केलं आहे.
जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, ‘राज्यात सत्तेवर असणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकरी उद्योजक, सर्वसामान्यांना मेटाकुटीला आणण्यासाठी केलेलं नियोजन हाणून पाडण्यासाठी आणि शेतकऱ्यांची चालवलेली थट्टा लाजीरवाणी आहे. त्याचा पर्दाफाश करण्यासाठी दृष्टिकोनातूनच उपनेत्या अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेनेचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला भगदाड
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम पदाधिकारी करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे गटाकडूनही पदाधिकारी नेमले गेले आहेत.
आदित्य ठाकरेंना उस्फूर्त प्रतिसाद
बंडखोरांच्या मतदारसंघात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही ऑगस्ट महिन्यात सभा घेत जिल्हा पिंजून काढला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांचे झालेले स्वागत आणि त्यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहून बंडखोरांना चांगलाच धसका बसला होता. आजरा तालुक्यातही त्यांचे झालेले स्वागत बंडखोरांना विचार करायला लावणारे होते.
अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात
दरम्यान, ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांचा हा पक्षप्रवेश झाला. पक्ष प्रवेशानंतर एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, येणाऱ्या काळात सुषमा अंधारे असू दे की कोणी असू देत, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार. तसेच सुषमाने राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच आमच्यात मतभेद झाले, तेव्हापासून आमचा काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या