Table Tennis Tournament : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या डब्ल्यूटीटी यूथ कन्टेंडर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचा (Tanisha Kotecha) हिने मुलींच्या 17 आणि 19 वर्षांखालील दोन्ही वयोगटांत अंतिम फेरीत धडक मारत रजतपदके पटकावली. या स्पर्धेत कझाकिस्तान, हाँगकाँग चायना, इराण, उझबेकिस्तान, अर्मेइना, अजरबैजान, जॉर्डन, जॉर्जिया, युक्रेन, बेल्जियम, यूएई, स्वीडन व ग्रीस या देशांतील टेबल टेनिसपटूंनी सहभाग घेतला होता. तनिशा ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रजतपदक मिळविणारी पहिली टेबल टेनिसपटू ठरली आहे.


स्पर्धेच्या 17 वर्षांखालील मुलींच्या गटात तनिशाने उपांत्य फेरीत इराणच्या एक्ता आदिबियणचा 3-1 ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत तिचा सामना हाँगकाँग चायनाची वांग हुई तुंग हिच्याबरोबर झाला. या सामन्यात तनिशाचा 3-1 असा पराभव झाल्याने तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीत तनिशाने हाँगकाँग चायनाच्या ली हुई मन करेन हिचा 3-1 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात हाँगकाँग चायनाच्याच काँग तत्झ लाम हिच्याकडून तनिशाचा 3-2 असा पराभव झाल्याने उपविजेतेपदासह रजतपदक मिळाले.


शेवटच्या झालेल्या चुरशीच्या खेळात तनिशाने 1-6 अशी पिछाडी भरून काढत 6-6 अशी बरोबरी केली आणि 8-6 अशी आघाडी घेतली. परंतु समोरच्या खेळाडूने दोन पॉइंट मिळवित 8-8 अशी बरोबरी साधली. शेवटी 10-9 अशी आघाडी तनिशाने घेतली परंतु काँग लामने 10-10 अशी बरोबरी केली आणि पुढी दोन पॉइंट मिळवित 12-10 असा सामना जिंकून विजेतेपद आपल्या नावे केले. तरीही तनिशाने अंतिम सामन्यात दिलेली झुंज वाखाणण्यासारखी असून तिची ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलीच उल्लेखनीय कामगिरी आहे. दरम्यान, तनिशा ही प्रशिक्षक जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील तिच्या या यशाबद्दल जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, पुरस्कार विजेते कमलेश मेहता, शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, जय मोडक आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.


केरळमध्येही तनिशाचा डंका


जून 2022 मध्ये केरळ येथील अलपुझा येथे पार पडलेल्या 83 व्या ज्युनिअर आणि युवा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात नाशिकच्या तनिषा कोटेचा हिने विजय मिळत राष्ट्रीय चॅम्पियन पटकावले होते. या स्पर्धेतही अंतिम लढतीत तनिषाने प्रतिस्पर्धी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या सुभंक्रिताचा  11-6,11-6,11-5,11-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले होते.


अशी आहे कारकीर्द


नाशिकची तनिषा आणि सायली यांची महाराष्ट्राच्या 17 व 17 महिला गटाच्या संघात निवड झाली होती. एका सीझनमध्ये तीन तीन संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या दोघी नाशिकच्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या होत्या. तनिषाने यापूर्वी जर्मनी ऑस्ट्रिया, स्पेन येथे झालेल्या यूथ कंडेडर स्पर्धेत सहभागी झाली होती.


हे देखील वाचा-