National Chess Championship : गुजरातच्या अहमदाबाद येथे सात वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा (National Chess Championship) पार पडल्या. यावेळी तामिळनाडूच्या शर्वनिकाने (Sharvaanica A S)  सुवर्णपदक जिंकलं असून केरळच्या दिवि बिजेशला (Divi Bijesh) रौप्य तर मुंबईच्या त्वेशा जैनला (Tvesha Jain) कांस्यपदक मिळालं आहे. अनेक मानांकित खेळाडूंवर मात करीत या तिघींनी केलेल्या कामगिरीचे आणि यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


या स्पर्धेमध्ये 23 राज्यांमधील शंभरहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. या गटात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या काही खेळाडूंचाही समावेश होता. त्यामुळेच यंदा ही स्पर्धा अतिशय आव्हानात्मक झाली होती. या सर्वांमध्ये मुंबईकर त्वेशाने अकरा फेऱ्यांमध्ये साडेआठ गुणांची कमाई केली. सहाव्या फेरीत तेलंगणाच्या अमेया अग्रवालविरुद्ध तिने मिळविलेला विजय या स्पर्धेतील आश्चर्यकारक विजय मानला गेला. चार तासांच्या झुंजार लढतीनंतर त्वेशा हिने हा डाव जिंकला. पदक जिंकण्यासाठी शेवटच्या फेरीत त्वेशा हिला विजय अनिवार्य होता. या फेरीत तिच्याविरुद्ध उत्तर प्रदेशच्या संस्कृती यादव हिचं आव्हान होतं. शेवटपर्यंत संयम चिकाटी आणि जिद्द याचा समन्वय ठेवीत त्वेशा हिने हा डाव जिंकून कास्यपदकावर नाव नोंदविले.


कांस्यपदकावर नाव कोरणारी त्वेशा मुंबईची असून तिने साडेतीन वर्षांची असताना बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. घरातूनच तिला वडील आणि आजोबांकडून बुद्धिबळाचे बाळकडू लाभले आहे. त्यानंतर तिला ज्येष्ठ प्रशिक्षक वीरेश तामिरेड्डी यांचे मार्गदर्शन मिळत असून ती दररोज चार ते पाच तास सराव करते. अनेक जेतेपदं मिळवणारा मॅग्नस कार्लसन हा तिचा आदर्श खेळाडू आहे त्याच्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याचे तिचे ध्येय आहे. यंदाच्या या दमदर कामगिरी मुळे भविष्यात त्वेशासाठी अनेक संधी आहेत कारण ती पुढील वर्षी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये अधिकृतपणे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे 


हे देखील वाचा -


Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची जबरदस्त खेळी! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ठोकलं दुसरं शतक, कोहली-शर्मालाही टाकलं मागे