मुंबई : आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलमधल्या पदार्पणाच्या सामन्यात 6 बळी घेणारा अल्जारी जोसेफ आयपीएलमधील आगामी सामन्यांना मुकणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अल्जारी जखमी झाला होता. या दुखापतीतून तो अद्याप सावरलेला नाही.


शनिवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना सीमारेषेजवळील एक चेंडू अडवण्यासाठी अल्जारीने डाईव्ह मारली. यावेळी त्याच्या हाताला आणि खांद्याला मोठी दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे अल्झारी संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे.

आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात अल्झारीने केवळ 12 धावांत 6 बळी घेतले होते. आयपीएलच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. आयपीएलच्या पहिल्याच सीझनमध्ये सोहेल तन्वीरने 14 धावा देत 6 बळी घेऊन विक्रम रचला होता. हा विक्रम तब्बल 12 वर्षांनी अल्जारीने मोडीत काढला.

मुंबई इंडियन्सचा आज वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध सामना होणार आहे. आजच्या सामन्यात अल्झारीच्या जागी जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा मुंबईच्या संघात परतणार आहे. मुंबई सध्या गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहे. आजचा सामना जिंकून मुंबईचा पुन्हा एकदा तिसरे स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.