सुरेश रैनानेही त्याची लेक ग्रेसियासोबतच ग्रुप फोटोला पोज दिली.
मुरली विजयला यंदाच्या मोसमात खेळण्याची संधी मिळाली नाही. पण तोही आपल्या चिमुरड्यांच्या साथीने ग्रुप फोटोत सामील झाला.
मग हरभजनसिंहही लाडाने त्याची लेक हिनायाला घेऊन आला. पण तिला कुठे फोटोत उभं राहायचं होतं. तिने भोकांड पसरलं आणि ती निघून गेली.
आयपीएलच्या अकराव्या मोसमाची चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्सच्या फोटो सेशनचा हा होता हालहवाल... त्यांच्या ‘डॅड्स आर्मी’ या टोपणनावाला साजेसा.
चेन्नईने यंदाच्या मोसमासाठी धोनीसह रैना आणि रवींद्र जाडेजाला आपल्या फौजेत कायम राखलं होतं. त्यातल्या धोनीचं वय होतं छत्तीस आणि रैनाचं एकतीस. मग आयपीएलच्या लिलावात चेन्नईने 36 वर्षांचा शेन वॉटसन, 32 वर्षांचा अंबाती रायुडू, 34 वर्षांचा ड्वेन ब्राव्हो, 37 वर्षांचा हरभजनसिंह, 34 वर्षांचा मुरली विजय आणि 39 वर्षांचा इम्रान ताहिर यांच्यावर यशस्वी बोली लावली.
वास्तविक ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट हा तरुणांचा, उसळत्या रक्ताच्या शिलेदारांचा खेळ मानला जातो. त्यामुळे चेन्नईच्या फौजेत तिशीपल्याडच्या नऊ वीरांना पाहून अनेकांनी नाकं मुरडली. यलो आर्मीला कुणीतरी ‘डॅड्स आर्मी’ असं हिणवून नव्याने बारसंही केलं. अखेर त्याच ‘डॅड्स आर्मी’ने आयपीएलच्या झळाळत्या ट्रॉफीवर चेन्नई सुपर किंग्सचं नाव कोरुन साऱ्यांची तोंडं बंद केली.
आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. चेन्नईने याआधी 2010 आणि 2011 साली आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. पण यंदा आयपीएल जिंकणं हे चेन्नईच्या दृष्टीनं अधिक मोलाचं ठरलं. कारण 2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे चेन्नईची फौज गेली दोन वर्ष आयपीएलच्या रणांगणात उतरु शकली नव्हती. चेन्नईने यंदा विजेतेपद पटकावून आयपीएलमधलं पुनरागमन मोठ्या रुबाबात साजरं केलं.
चेन्नईच्या यंदाच्या मोसमातल्या यशात तिशीपल्याडच्या वीरांनीच प्रमुख भूमिका बजावली. शेन वॉटसन नावाच्या 36 वर्षांच्या वादळात सनरायझर्स हैदराबादची फौज पालापाचोळ्यासारखी उडून गेली. आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये शतक झळकावणारा तो रिद्धिमान साहानंतरचा दुसरा फलंदाज ठरला. वॉटसनने 57 चेंडूंत 11 चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद 117 धावांची खेळी उभारली. त्याच्या आयपीएल कारकीर्दीतलं हे चौथं शतक ठरलं. वॉटसनने 31 वर्षांच्या सुरेश रैनाच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 57 चेंडूंत 117 धावांची भागीदारी उभारली. या भागिदारीने तर हैदराबादच्या आव्हानातली हवाच काढून घेतली.
यंदाच्या मोसमात चेन्नईकडून चारही तिशीपल्याडच्या फलंदाजांनी सुपर परफॉर्मन्स दिला. 32 वर्षांचा अंबाती रायुडू विशीच्या तडफेने खेळला. त्याने सोळा सामन्यांमध्ये 149.75 च्या स्ट्राईक रेटने 602 धावांचा रतीब घातला. त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. शेन वॉटसनने 15 सामन्यांमध्ये 555, धोनीने 16 सामन्यांमध्ये 455 आणि रैनाने 15 सामन्यांमध्ये 445 धावांची वसुली केली.
चेन्नईच्या गोलंदाजांनी बजावलेली एकत्रित कामगिरीही त्यांच्या सुपर यशात निर्णायक ठरली. चेन्नईच्या शार्दूल ठाकूरने 13 सामन्यांमध्ये सर्वाधिक 16 फलंदाजांना माघारी धाडलं. पण तिशीपल्याडचा ड्वेन ब्राव्होनेही त्याच्या खांद्याला खांदा भिडवून चेन्नईच्या आक्रमणाचा भार वाहिला. ब्राव्होने 16 सामन्यांमध्ये 14, लुन्गी एनगिडीने सात सामन्यांमध्ये 11, रवींद्र जाडेजाने 16 सामन्यांमध्ये 11 आणि दीपक चहारने 12 सामन्यांमध्ये 10 फलंदाजांना माघारी धाडलं. पण हरभजनसिंह, शेन वॉटसन आणि इम्रान ताहिर या थर्टी प्लस गोलंदाजांनी अनुक्रमे सात, सहा आणि सहा विकेट्स काढून चेन्नईच्या यशात खारीचा वाटा उचलला.
चेन्नईच्या सुपर किंग्सची सांघिक कामगिरी ही त्यांच्या यशाचं गमक मानलं जात आहे. त्यात चुकीचंही काही नाही. पण खरं सांगायचं तर चेन्नईच्या फौजेतल्या तिशीपल्याडच्या वीरांनी तुलनेत तरुणांनाही लाजवेल अशी बजावलेली कामगिरी त्यांच्या यशात निर्णायक ठरली आहे.