बंगळुरु : कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार सिद्धू न्यामगौडा यांचा आज रस्ते अपघातात मृत्यू झाला. जामखंडी मतदारसंघाचे आमदार सिद्धू न्यामगौडा गोव्याहून आपल्या बागलकोट गावाला जाताना आज सकाळी हा अपघात झाला.


तुलासिगेरीमध्ये त्यांच्या इन्होवा गाडीचा टायर फुटल्याने कठड्याला धडक बसून हा अपघात झाला. ज्यात सिद्धू न्यामगौडा यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन सहकारी जखमी झाले आहेत.

न्यामगौडा हे कर्नाटक विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी भाजप उमेदवार श्रीकांत सुबराव कुलकर्णी यांचा 2,795 मतांनी पराभूत केलं होतं.

याआधी 1990-91 मध्ये सिद्धू न्यामगौरा हे बगलकोट लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे कोळसा मंत्रालयचा पदभार होता.

कर्नाटक विधानसभेत 3 जागा रिकाम्या

सिद्धू यांच्या निधनानंतर काँग्रेस आमदारांची संख्या कमी होऊन 77 झाली आहे. तर कर्नाटकच्या 224 पैकी 222 जागांचे निकाल आले होते. या दोन जागांवर निवडणूक झाली नाही, तर आता सिद्धू न्यामगौडा यांच्या मृत्यूनंतर कर्नाटक विधानसभेत एकूण तीन जागा रिकाम्या झाल्या आहेत.