नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला बीसीसीआयच्या टॉप ग्रेड कॉन्ट्रॅक्टमध्ये जागा मिळणं कठिण दिसत आहे. क्रिकेट प्रशासक समितीने बुधवारी कॉन्ट्रॅक्टच्या नव्या फॉर्मुल्यावर चर्चा केल्याची माहिती आहे.


या समितीने A+, A, B, C असे चार फॉर्म्युले निश्चित केले आहेत. ज्यामुळे अनेक वर्षांनंतर भारतीय क्रिकेटपटूंच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. धोनी सध्या ग्रेड A मध्ये विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रवीचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांच्यासोबत आहे.

ग्रेड ठरवताना क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटवरही चर्चा करण्यात आली, ज्यामुळे धोनी यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. कारण त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. त्यामुळे धोनीला टॉप ग्रेड कॉन्ट्रॅक्टमध्ये जागा मिळणं अशक्य दिसत आहे.

क्रिकेट प्रशासक समिती लवकरच आपला अहवाल बीसीसीआयच्या आर्थिक समितीला सोपवणार आहे. रोटेशन पॉलिसीनुसार जे खेळाडू मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून बाहेर आहेत, त्यांना टॉप ग्रेडमध्ये कायम ठेवण्यासाठी इतर फॉरमॅटमधील त्यांची आयसीसी रँकिंगही पाहिली जाईल.