केपटाऊन : टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत शंका आहे. कारण, तो तापाने फणफणला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुखापतीतून सावरला असून तो पहिल्या कसोटीत खेळणार आहे.
बीसीसीआयने एक पत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. जाडेजा गेल्या काही दिवसांपासून तापाने ग्रस्त आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम आणि केपटाऊनमधील स्थानिक मेडिकल टीम त्याची देखरेख करत असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.
मेडिकल टीमने जाडेजाला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 48 तासात त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याचा निर्णय सामना सुरु होण्याच्या दिवशी सकाळी घेतला जाईल, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
दरम्यान, शिखर धवन पूर्णपणे फिट असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, ज्यातला पहिला सामना शुक्रवारपासून सुरु होणार आहे.