हिंदी सिनेसृष्टी, मराठी सिनेसृष्टी, मालिका, नाटक इत्यादींना महाराष्ट्र बंदचा मोठा फटका बसला.
यातल्या अनेक मालिकांची शूटिंग सकाळी सुरु होत असल्यामुळे थेट कलाकारांना याचा फटका बसलेला नाही. अनेक मालिकांच्या सेटवर दुपारचं जेवण मात्र पोहोचू शकलेलं नाही.
‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेचं शूट ठाण्याला सुरु आहे. शूट व्यवस्थित सुरु असलं तरी रास्ता रोकोमुळे या टीममधल्या 100 लोकांचं जेवण मात्र पोहोचू शकलेलं नव्हतं.
हिंदीमध्ये ‘यह रिश्ता क्या कहलाता’, ‘पिया अलबेला’, ‘साम दाम’ आदी हिंदी मालिकांची फिल्मसिटीमधली शूटिंग रद्द झाली आहेत. फिल्मसिटीमध्ये ‘विठूमाऊली’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मराठी मालिंकांची शूटिंग चालू आहेत. या कलाकारांना आत घेण्यासाठी फिल्मसिटीमधलं 5 नंबर गेट उघडण्यात आलं आहे. होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मालिकांच्या प्रॉडक्शन हाऊसेसनी चारचाकी ऐवजी दुचाकी पाठवून कलाकारांना सेटवर आणलं.
या रास्तारोकोचा फटका सिनेसृष्टीलाही बसला आहे. बुधवारचे सर्व थिएटर्सचे मॉर्निंग शो सुरु झाले खरे. पण मुंबईतली स्थिती लक्षात घेता त्यानंतर मात्र सर्व थिएटर्समध्ये शो रद्द करण्यात आल्याची माहिती वितरक अंकित चंदरामानी यांनी दिली.
आज मुंबईत तीन ठिकाणी नाटकांचे प्रयोग होणार आहेत. बोरिवलीला ‘अनन्या’, ठाण्यात ‘हसवा फसवी’ आणि शिवाजी मंदीर दादर इथे ‘श्यामची आई’ या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. प्रयोग करण्याचा मानस कलाकारांचा आहे. पण या नाटकाला प्रेक्षक उपस्थिती बाबात मात्र सर्वत्र संभ्रम दिसतो.