Moto GP : जगातील सर्वात प्रसिद्ध अशी बाईक शर्यत असणाऱ्या मोटो जीपी (Moto GP) स्पर्धांचा थरार आता भारतात अनुभवता येणार आहे. ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट (Buddh International Circuit) याठिकाणी पुढील वर्षी पहिल्या-वहिल्या मोटो ग्रँड प्रिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसचे आयोजन करण्यात आलं आहे. याला 'भारतीय ग्रँड प्रिक्स' (Bharat Grand Prix) असं नाव देण्यात आलं आहे. फेडरेशन इंटरनॅशन दे मोटरसायकल (Fédération Internationale de Motocyclisme) अर्थात FIM ने त्यांचे व्यावसायिक भागीदार डोर्ना स्पोर्ट्स (Dorna Sports) सोबत बुधवारी (21 सप्टेंबर) नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली. FIM, Dorna Sports आणि नोएडा येथील Fairstreet Sports यांच्यामदतीने पुढील 7 वर्षांच्या कालावधीसाठी भारत ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या स्पर्धेत 19 देशांतील स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यामुळे एक भव्य स्पर्धा होणार असल्याने देशात रोजगाराच्या संधी नक्कीच उपलब्ध होतील. तसंच देशातील पर्यटन आणि व्यवसायालाही चालना मिळणार आहे. बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे मोटो ग्रँड प्रिक्स शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे. याठिकाणीच फॉर्म्युला वन इंडियन ग्रांड प्रिक्स 2011 ते 2013 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. परंतु आर्थिक अडचणींमुळे पुढे जाऊन स्पर्धा रद्द करण्यात आली होती. पण आता मोटो जीपी स्पर्धा याठिकाणीच पार पडणार आहेत. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे होणार्या मोटो ग्रँड प्रिक्सबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "उत्तर प्रदेशसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे यूपीमधील पर्यटन क्षेत्राला देखील चालना मिळणार आहे. यासोबतच यूपीला जागतिक व्यासपीठही नक्कीच मिळेल.
मोटो जीपी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 मध्ये फॅबियो चॅम्पियन
दरम्यान मोटो जीपी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 या स्पर्धेमध्ये, यामाहा मोटो जीपी संघाचा फॅबियो क्वाटारो चॅम्पियन बनला. तसंच डुकाटी संघाच्या फ्रान्सिस्को बागनायाने दुसरे स्थान पटकावले. तर जोन मीर याने तिसरे स्थान पटकावले.
हे देखील वाचा-
- India Womens Asia Cup Squad : महिला आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर, हरमनप्रीत कौरकडे नेतृत्त्व, पाहा संपूर्ण संघ
- T20 Record : टी20 क्रिकेटमध्ये मोहम्मद रिझवानचा जलवा कायम, विराटचा आणखी एक रेकॉर्ड मोडला