IND vs SA : केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी मोहम्मद सिराजच्या माऱ्यासमोर अक्षरश: गुडघे टेकले. मोहम्मद सिराजने पहिल्याच सत्रात दक्षिण आफ्रिका संघाच्या 5 फलंदाजांना बाद करून इतिहास रचला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा 23.2 षटकांत अवघ्या 55 धावांत धुव्वा उडाला. मोहम्मद सिराजने आतापर्यंत 6 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमारने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.






मोहम्मद सिराजने इतिहास रचला


मोहम्मद सिराजने प्रथम एडन मार्करमला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर डीन एल्गरला तंबूत धाडले. अशा प्रकारे दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर सिराजने डॉनी डी जोर्जी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइली वेरेयन आणि मार्को यानसेन यांना बाद केले. अशाप्रकारे सिराजने पहिल्याच सत्रात 5 फलंदाजांना बाद करून मोठी कामगिरी केली. 8 फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.






तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पॅव्हेलियनकडे वळत राहिले. दक्षिण आफ्रिकेचा संघ 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला होता.


तब्बल 8 फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद


दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे केवळ 2 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. काइली वेरेनीने सर्वाधिक 15 धावा केल्या. याशिवाय डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर अवघ्या 4 धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने डीन एल्गरची महत्त्वाची विकेट घेतली. सलामीवीर एडन मार्करम आणि डीन एल्गर यांच्यानंतर टोनी जोर्जी पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर यजमान फलंदाजांची पॅव्हेलियनमध्ये परतण्याची प्रक्रिया सुरूच राहिली. ट्रिस्टन स्टब्स, बेडिंगहॅम, वेरेनी, युनसेन, केशव महाराज आणि कागिसो रबाडा यांनी अनुक्रमे 3, 12, 15, 0, 3 आणि 5 धावा केल्या.




केपटाऊनचं मैदान इतिहासाला जागलं!


टीम इंडियाने आतापर्यंत येथे 6 कसोटी सामने खेळले आहेत आणि ते एकदाही जिंकलेले नाहीत. भारतीय संघाने येथे 4 सामने गमावले असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. याउलट दक्षिण आफ्रिकेने घरच्या मैदानावर 59 पैकी 27 कसोटी सामने जिंकले आहेत आणि 21 गमावले आहेत. केपटाऊनच्या न्यूलँड्समध्ये आतापर्यंत 60 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये 15 वेळा संघांना 100 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. या मैदानाची किमान धावसंख्या अवघी 35 आहे. 1899 मध्ये इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ  कोसळला होता. असेच आणखी चार वेळा घडले आहे, जेव्हा संघ 50 धावांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 


तसेच मोठ्या धावसंख्येचे सुद्धा  सामने झाले आहेत. 16 वेळा 500 धावांचा टप्पा ओलांडला गेला आहे. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 651 धावांची आहे, जी दक्षिण आफ्रिकेने मार्च 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात केली होती.


इतर महत्वाच्या बातम्या