Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, लवकरच शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या शमीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता खेळातील सर्वात मोठ्या पुरस्काराच्या यादीत मोहम्मद शमीचे नाव समाविष्ट झाले आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाला याची शिफारस केली आहे.
बीसीसीआयकडून नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी विशेष विनंती
क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने शमीचे नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी विशेष विनंती केली होती, ज्यापूर्वी देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट नव्हते. शमीने एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेतल्या, त्याने अवघ्या सात सामन्यांमध्ये 24 विकेट घेतल्या. पहिल्या चार सामन्यांमधून बाहेर राहिल्यानंतर शमीला जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला, तो आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळू शकतो.
या वर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार ठरवण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने 12 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए.एम.खानविलकर या समितीचे अध्यक्ष असतील. त्यांच्याशिवाय हॉकीपटू धनराज पिल्ले, माजी टेबल टेनिसपटू कमलेश मेहता, माजी बॉक्सर अखिल कुमार, महिला नेमबाज आणि विद्यमान राष्ट्रीय प्रशिक्षक शुमा शिरूर, माजी क्रिकेटपटू अंजुम चोप्रा, बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे आणि पॉवरलिफ्टर फरमान पाशा यांचाही समितीत समावेश आहे.
एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीला फक्त 7 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याला पहिल्या 4 सामन्यांमधून बाहेर ठेवण्यात आले होते. पण पाचव्या सामन्यात शमी प्लेईंग इलेव्हनमध्ये परतल्यावर त्याने आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची दाणादाण केली. शमीने केवळ 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद शमी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.
शमीने या स्पर्धेत तीनवेळा 5 विकेट घेतल्या होत्या. त्याची धोकादायक गोलंदाजी प्रत्येक संघाविरुद्ध पाहायला मिळाली. सध्या शमी दुखापतीमुळे संघाबाहेर आहे पण आता तो बरा झाल्यानंतर मैदानात परतण्यासाठी सज्ज आहे. शमीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने टीम इंडियासाठी 64 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. शमीच्या नावावर कसोटीत 229, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 195 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 24 बळी आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या