Rohit Sharma Interview after World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 संपून एक महिना होत चालला आहे. मात्र, टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची निराशा अजून लपलेली नाही. विश्वचषकात रोहित शर्माने भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आणि आपल्या संघाला अत्यंत शानदारपणे अंतिम फेरीत नेले होते. रोहित शर्माच्या संघाने सुरुवातीपासून उपांत्य फेरीपर्यंत एकामागून एक सर्व 10 सामने जिंकले होते आणि त्यानंतर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना केला होता, परंतु त्या सामन्यात पराभवानंतर रोहित शर्मा इतका निराश झाला होता की त्याला आपल्या भावना लपवता आल्या नाहीत आणि मैदानावरच रडू कोसळले.


वर्ल्डकप फायनलनंतर रोहितची पहिली मुलाखत 


विश्वचषक फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्माने काही दिवस विश्रांती घेतली होती. त्याने कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवला आणि आता विश्वचषक संपल्यानंतर 20 दिवसांनी रोहित शर्माने पहिल्यांदाच मुलाखत दिली. या मुलाखतीतही रोहित शर्माच्या चेहऱ्यावरची निराशा आणि त्याच्या आवाजात भावनिकता स्पष्टपणे झळकते. 


रोहित म्हणाला की, "मला या दु:खातून कसे बाहेर पडावे, याची कल्पना नव्हती, सुरुवातीचे काही दिवस मला काय करावे हे देखील कळत नव्हते. त्यानंतर माझे कुटुंब आणि मित्रांनी माझ्यासाठी चांगले वातावरण तयार केले, मला त्या दुःखावर मात करण्यास मदत केली. ते (विश्वचषक अंतिम पराभव) विसरणे सोपे नाही, पण आयुष्य पुढे सरकते आणि तुम्हीही पुढे जा. पण खरे सांगायचे तर ते खरोखर अवघड होते."






रोहित पुढे म्हणाला की, "मी लहानपणापासून 50 षटकांचा विश्वचषक पाहत मोठा झालो आहे आणि माझ्यासाठी 50 षटकांचा विश्वचषक हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. आम्ही या विश्वचषकासाठी इतकी वर्षे काम केलं आणि ते खरंच आहे. जेव्हा तुम्ही हा खेळ खेळता आणि तुम्हाला जे हवे आहे ते मिळत नाही, तुम्ही ज्याचे स्वप्न पाहता ते तुम्हाला मिळत नाही आणि तुम्ही निराश होता."


अंतिम फेरीनंतर पुढे जाणं कठीण होते


टीम इंडियाचा कर्णधार पुढे म्हणाला की, "मला वाटतं की आम्ही आमच्या बाजूने जे काही करता येईल ते केले. कोणीतरी मला विचारले, तू काय चूक केलीस? कारण आम्ही 10 सामने जिंकले, आणि "त्या 10 सामन्यांमध्येही आम्ही चुका केल्या आणि त्या चुका प्रत्येक सामन्यात घडतात. तुम्ही एक सामना पूर्णपणे चांगला खेळू शकत नाही, तुम्ही एक सामना खूप चांगला खेळू शकता, परंतु तुम्ही पूर्णपणे चांगले खेळू शकत नाही."


आपल्या संघाबद्दल बोलताना रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “जर मी त्याची दुसरी बाजू पाहिली तर आम्ही ज्या पद्धतीने खेळलो ती खरोखरच चांगली कामगिरी होती, कारण प्रत्येक विश्वचषकात तुम्हाला अशी कामगिरी होत नाही, आम्ही फायनलपर्यंत ज्या पद्धतीने खेळलो त्यामुळे लोकांना आनंद आणि अभिमान वाटला असेल.”


हिटमॅन पुढे म्हणाला की, "अंतिम सामन्यानंतर परत येणे आणि पुढे जाणे खूप कठीण होते, म्हणून मी ठरवले की मी कुठेतरी जावे आणि या सर्व गोष्टींमधून माझे मन काढले पाहिजे. यादरम्यान बरेच लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी आमचे कौतुक केले. मला त्या सर्व लोकांचे वाईट वाटते, कारण ते नेहमी आमच्या सोबत होते, आणि आमच्यासोबत विश्वचषक जिंकण्याची स्वप्ने पाहत होते. या विश्वचषकादरम्यान आम्ही जिथे जिथे गेलो तिथे आम्हाला चाहत्यांचा भरपूर पाठिंबा होता, जे स्टेडियमवर आले, घरून सामने पाहिले, त्या सर्वांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. त्या दीड महिन्यांत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी कौतुक करतो, परंतु मी जितका विचार करेन तितका मी अधिक निराश होतो, मग पुढे जाऊ शकणार नाही."


इतर महत्वाच्या बातम्या