लखनौ : वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजीमध्ये समतोल राखण्यासाठी कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी करत असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बाकड्यावर बसवण्यात आले होत. न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्या जायबंदी झाल्याने दोन बदल करण्यात आले आणि मोहम्मद शमीची टीम इंडियात आकस्मिक एन्ट्री केली. ज्या न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया हबकून होती, त्याच न्यूझीलंडला पाच विकेट घेत शमीने पाणी पाजले आणि त्याने बाकड्यावरचा राग बाहेर काढला. त्याच रागाचा आणि प्रतिभेचा दुसरा अंक आज इंग्लंडविरुद्ध पाहायला मिळाला. त्याने तब्बल चार विकेट घेत टीम इंडियाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.
वर्ल्डकपमधील रेकाॅर्ड पाहून अंगावर शहारे येतील!
वर्ल्डकपमध्ये फक्त 13 सामने घेतलेल्या शमीच्या नावावर तब्बल 40 विकेट जमा झाले आहेत. यामधील तब्बल 9 विकेट त्याने सलग दोन सामन्यात घेतले आहेत, तर त्यापूर्वीच्या 2019 मधील शेवटच्या सामन्यात त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. यावरून शमी धारदार गोलंदाजी लक्षात येते.
विश्वचषक 2023 च्या सहाव्या सामन्यात भारताचा डाव अवघ्या 229 धावांवर आटोपला, तेव्हा इंग्लंड जखमी सिंहासारखा हल्ला करेल, असे सर्वांना वाटत होते. धावसंख्या लहान होती, त्यामुळे इंग्लंड आपला पराभवाचा सिलसिला तोडेल अशी आशा होती. मात्र, एकना स्टेडियमवर शमी आणि बुमराहने आग ओकण्यास सुरुवात केली. पाच षटकांत इंग्लंडची धावसंख्या 30 धावा होती. दोन्ही सलामीवीर सेट झाल्याने विकेटची नितांत गरज होती. बुमराहने लागोपाठ दोन चेंडूत विकेट घेताना पाहून मोहम्मद शमीही उत्साहित झाला.
कर्णधार रोहित शर्माने सहाव्या षटकात मोहम्मद शमीला प्रथमच पाचारण केले. दोन स्लिपसह गोलंदाजी करणाऱ्या शमीने केवळ तीन धावा दिल्या. शमी त्याच्या दुसऱ्या षटकात अधिक धोकादायक दिसायला लागला. पहिल्या पाच चेंडूंमध्ये स्टोक्सला त्याने सतावले. स्टोक्सला चेंडूला स्पर्शही करता आला नाही. हीच बाब आपला अहंकार मानून त्याने तीच चूक केली जी शमीला हवी होती. स्टोक्स 0 धावांवर क्लीन बोल्ड झाला.
दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर स्टोक्सला बाद केल्यानंतर शमीने तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टोला क्लीन बोल्ड केले. विश्वचषक 2019 मध्ये भारताविरुद्ध शतक झळकावणारा जॉनी बेअरस्टो यावेळी 23 चेंडूत केवळ 14 धावा करून गेला. 39 धावांवर इंग्लंडला हा चौथा धक्का होता. दुसऱ्या स्पेलमध्ये कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद शमीवर विश्वास व्यक्त करताना इंग्लंडचे कंबरडे मोडले. मोईन अलीची ती मौल्यवान विकेट घेतली, जी भारतासाठी डोकेदुखी ठरू शकत होती.