IPL 2021, MI vs SRH : आज चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत सुरु आहे. मुंबईनं पहिल्यांदा फलंदाजी करत हैदराबादला 151 धावांचं आव्हान दिलं आहे. शेवटच्या षटकात कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने 20 षटकात 5 बाद 150 धावा केल्या. पोलार्ड 22 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 35 धावांवर नाबाद राहिला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या मुंबईला कर्णधार रोहित शर्मा आणि डी कॉकनं चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये संघाला अर्धशतकाचा टप्पा पार करुन दिला. मात्र रोहित स्थिरावला असे वाटत असतानाच 32 धावांवर विजय शंकरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर आलेल्या सूर्यकुमारनं एक चौकार आणि एक षटकार ठोकला खरा मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो 10 धावांवर बाद झाला. यानंतर मुंबईच्या संघानं अत्यंत संथ खेळी केली. ईशान किशननं 21 चेंडूत 12 तर डीकॉकनं 39 चेंडूत 40 धावा केल्या.
हार्दिक पांड्यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो 7 धावांवर बाद झाला. शेवटी पोलार्डनं केलेल्या फटकेबाजीमुळं मुंबईला 150 धावा करता आल्या.
मागील दोन सामन्यात धावांचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागलेल्या हैदराबादला पहिल्या विजयाची आशा आहे. तर कोलकात्याविरोधात मागील सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेली रोहित ब्रिगेड हा सामना जिंकून गुणतालिकेत नंबर एकवर जाण्यास उत्सुक आहे.