IPL 2020, KXIPvsRR : किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना आयपीएलमध्ये शुक्रवारी अबू धाबी येथे होणार आहे. आजचा सामना जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाब प्ले-ऑफमध्ये आपली जागा पक्की करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे राजस्थान संघही हा सामना जिंकून स्पर्धेत आणखी  एक पाऊन पुढे जाण्याच प्रयत्न करेल. पंजाबने आतापर्यंत 12 सामने खेळले असून यामध्ये 6 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थानने 12 सामने खेळले असून, केवळ 5 सामने जिंकले आहेत. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील. पंजाबचा संघ याक्षणी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि हा फॉर्म कायम ठेवण्याचा ते प्रयत्न करतील. राजस्थान रॉयल्स संघानेही मुंबई इंडियन्सला शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी करून पराभूत केले आहे.


पंजाबचा सलग 5 सामन्यात विजय


यंदाच्या मोसमात पंजाबची सुरुवात खराब झाली. मात्र खराब सुरुवातीनंतर पंजाबने स्वत:ला सावरत शेवटचे 5 सामने जिंकले आहेत आणि प्ले ऑफ शर्यतीत आपलं आव्हान कायम ठेवलं आहेत. राजस्थानविरुद्ध पंजाबला काहीही करुन विजय नोंदवावा लागणार आहे. पंजाबचा कर्णधार केएल राहुल व्यतिरिक्त मयंक अगरवाल, मनदीप सिंग, ख्रिस गेल आणि निकोलस पूरन हे फॉर्ममध्ये आहेत. केएल राहुलने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर मोहम्मद शमीही याक्षणी फॉर्ममध्ये आहे. अरशदीप सिंग आणि ख्रिस जॉर्डन यांचीही साथ त्याला मिळत आहे.


अखेरच्या सामन्यात राजस्थानची दमदार कामगिरी


राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. त्या सामन्यात राजस्थानने मुंबईवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयात बेन स्टोक्सची मोलाची कामगिरी होती. स्टोक्सने मुंबईविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्याच्याशिवाय संजू सॅमसनसुद्धा चांगली लयीत आहे. या दोघांशिवाय कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि राहुल तेवतियादेखील पंजाबसाठी अडचण बनू शकतात. गोलंदाजीमध्ये जोफ्रा आर्चरने आतापर्यंत खूप यशस्वी ठरला आहे.