मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एबीपी माझाशी बोलताना किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे कि कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा केला आहे. किरीट सोमय्या यांचा दावा आहे की उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी 72 तासांच्या आत एका खाजगी बिल्डराची 500-700 कोटींची जागा 3000 कोटींमध्ये विकत घेण्याचा प्रस्ताव पास केला.


किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालय उभं करण्यासाठी 7000 कोटी तसंच जमिनीसाठी 3000 कोटी तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 2000 कोटी मंजूर केले गेले. पण हे सगळं करताना कायदेशीर कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही.


किरीट सोमय्या यांचा आरोप आहे कि उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात, आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची, महानगरपालिका अधिकाऱ्यांशी किंवा त्यांच्या मित्रपक्षांशी चर्चा न करता कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा केली आणि या चर्चेच्या नंतर महापालिका आयुक्तांनी तातडीने हा प्रस्ताव पास करण्याची तयारी केली.


किरीट सोमय्या आंनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरे यांना हे रुग्णालय उभं करायचे नाही. फक्त आपल्या जवळच्या बिल्डरला 2000 कोटींचा फायदा पोहोचवण्यासाठी हा घोटाळा केला जात आहे. किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे की त्यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर हा प्रस्ताव सध्यासाठी थांबवण्यात आला आहे.


किरीट सोमय्या याविषया संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट आज भेट घेणार आहेत. राज्यपालांना भेटून त्यांना लोकायुक्तांकडून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्याची मागणी करणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.