Manchester City vs Manchester United : प्रत्येक खेळामध्ये काही असे संघ असतात, ज्यांचा सामना त्या संघाच्या फॅन्ससह इतर सर्वच क्रिडाप्रेमींना पाहायला आवडतात. यात क्रिकेटमध्ये जसं भारत-पाकिस्तान, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स तसंच इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेड विरुद्ध मँचेस्टर सिटी (Manchester City vs Manchester United). टूर्नांमेंटमधील अव्वल दर्जाचे हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा संपूर्ण फुटबॉल जगताचे लक्ष त्यांच्या सामन्याकडे लागून असते. आता हीच रंगतदार लढत रविवारी अर्थात 2 ऑक्टोबर रोजी अनुभवता येणार आहे.
दोन्ही संघासाठी महत्त्वाच्या या सामन्यात नेमके कोणते खेळाडू मैदानात उतरणार हे सामन्यादिवशीच कळणार आहे. दरम्यान मँचेस्टर युनायटेड म्हटलं की सर्वात पहिलं मनात येणारं नाव म्हणजे स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो(Cristiano Ronaldo). रोनाल्डोचा राष्ट्रीय संघ पोर्तुगाल नुकताच स्पेन विरुद्ध 1-0 च्या फरकाने पराभूत झाला. ज्यानंतर रोनाल्डोवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर आता रोनाल्डोला पुन्हा चाहत्यांची मनं जिंकण्याकरता या महामुकाबल्यात दमदार कामगिरी करणं महत्त्वाचं आहे. याशिवाय रॅशफोर्ड, ब्रुनो फर्नांडीस, सँचो यांच्या खेळाकडेही युनायटेड फॅन्सचं लक्ष असेल. मँचेस्टर सिटीचा विचार करता युवा स्टार खेळाडू Haaland कमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर संघाचा अनुभवी मिडफिल्डर केविन डी ब्रुन (De Bruyne) याच्यावरही मोठी जबाबदारी असणार आहे. तर भारतीय फॅन्सना सामना कधी आणि कुठे पाहता येईल जाणून घेऊ...
कधी आहे सामना?
हा महामुकाबला रविवारी अर्थात 2 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.फुटबॉलचे बरेच सामने हे मध्यरात्री असल्याने अनेकदा भारतीय फॅन्सना पाहता येत नाहीत. पण हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 ला होणार आहे. त्यामुळे फॅन्स नक्कीच या सामन्याचा आनंद लुटतील.
कुठे आहे सामना?
हा सामना मँचेस्टर सिटीचं होमग्राऊंड असणाऱ्या एतिहड स्टेडियम (Etihad Stadium) येथे खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
हे देखील वाचा-