IND vs SA, 2nd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs Sout Africa) यांच्यात सुरु टी-20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (2 ऑक्टोबर) बरासपरा क्रिकेट स्टेडियम गुवाहाटी येथे होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीला पोहोचली आहे. भारतीय खेळाडू लवकरच सराव सुरू करणार असून बीसीसीआयनं टीम इंडियाचा गुवाहाटीला पोहचल्यावरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात भारतीय खेळाडूंचे जंगी स्वागत होताना दिसत आहे. यावेळी दीपक चाहर आणि अर्शदीप यांच्या हस्ते केक कट केला. पहिल्या सामन्यातील त्यांच्या चमकदार कामगिरीमुळं त्यांना ही संधी दिली गेली असावी.


याशिवाय इतर भारतीय खेळाडूही व्हिडीओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये गुवाहाटी येथील निसर्गरम्य ठिकाणं दिसून येत आहेत. यामध्ये खेळाडू थांबलेलं हॉटेल दिसत आहे. भारतीय संघ गुवाहाटी येथे दाखल झाल्यानंतर सोशल मीडिया सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा काय झाडी, काय डोंगार, काय हाटील या डायलॉगची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. 


भारतीय संघाने तिरुवनंतपुरम येथे झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघ गुवाहाटीमध्ये पोहचला आहे. बीसीसीआयने तिरुवनंतपुरम येथून टीम इंडिया निरोप घेताना आणि गुवाहाटीमध्ये पोहचल्यानंतरचा एकत्र व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये आधी भारतीय संघ तिरुवनंतपुरममधून निघताना तेथील समुद्रकिनारा, नारळाची झाडे दिसत आहेत. त्यानंतर गुवाहाटीमध्ये भारतीय संघाचं झालेलं जोरदार स्वागतही दिसत आहे. 


पाहा VIDEO -






भारतीय संघ आघाडीवर


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या सुरु टी20 मालिकेतील पहिला सामना भारताने 8 विकेट्सच्या फरकाने जिंकला. यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत अवघ्या 106 धावांत रोखलं. यावेळी अर्शदीपने चमकदार कामगिरी केली. त्यानंतर भारताने 16.4 षटकांत केवळ दोन विकेट्स गमावत आव्हान पूर्ण करत सामना 8 विकेट्सने जिंकला. ज्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. आता दुसरा सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये तर तिसरा सामना 4 ऑक्टोबरला इंदोरमध्ये खेळवला जाईल. 


दक्षिण आफ्रेकेचा भारत दौरा


टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. यानंतर 6 ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आता 2 ऑक्टोबरला दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे होणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये पार रडणार आहे.


हे देखील वाचा-