Malaysia Open 2022 : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय (HS Pranoy) याने मलेशिया ओपनच्या (Malaysia Open 2022) उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या कांता त्सुनेयामा (Kanta Tsuneyama) याला मात देत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. एकीकडे पीव्ही सिंधूला चीनच्या ताय त्झू यिंगने (Tai Tzu Ying) पराभूत केल्यामुळे तिचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी प्रणॉय मात्र अजूनही स्पर्धेत असल्याने भारताला किमान पुरुष गटात विजयाची अपेक्षा आहे.


29 वर्षीय प्रणॉयने सुरुवातीपासून खेळावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं. त्याने सरळ दोन सेट्समध्ये हा विजय मिळवला. यावेळी प्रणॉयने पहिल्या सेटमध्ये 25-23 च्या फरकाने विजय मिळवला. तर दुसऱ्या सेटमध्ये 22-20 च्या फरकाने प्रणॉयने सेट जिंकत सामना आपल्या नावे केला. प्रणॉय या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचलेला एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे.



सिंधू मात्र पराभूत


बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) ही मात्र याच स्पर्धेत अर्थात मलेशिया ओपनच्या महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली आहे. चीनच्या ताय त्झू यिंगने (Tai Tzu Ying) सिंधूला पराभूत करत स्पर्धेबाहेर केल्यामुळे तिचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. 55 मिनिटं चाललेल्या या सामन्यात सिंधू 13-21, 21-12, 12-21 च्या फरकाने पराभूत झाली. उपांत्य पूर्व फेरीच्या या महत्तपूर्ण सामन्यात पहिल्या सेटमध्ये यिंगने दमदार खेळ दाखवला. आधीपासून चांगले पॉईंट्स जमवत ती थेट 13-21 अशा मोठ्या फरकाने जिंकली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने पुनरागमन केलं आणि 21-12 च्या फरकाने सिंधूने सेट जिंकला. ज्यानंतर अखेरचा आणि निर्णायक सेट कोण जिंकेल? याकडे सर्वांचे लक्ष्य होते. पण हा सेट 21-14 च्या फरकाने यिंगने जिंकत सामनाही नावे केला.


हे देखील वाचा-