मुंबई : भुवनेश्वर येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर नुकत्याच आयोजित 40 व्या ज्युनियर मुलामुलींच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राने सलग सातव्यांदा दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदित्य कुदळे आणि अश्विनी शिंदे यांना सर्वोत्तम अष्टपैलूचा पुरस्कार देण्यात आला. कुमारी गटात कोल्हापूरची वैष्णवी पोवार आणि महाराष्ट्राची वृषाली भोये यांना अनुक्रमे सर्वोत्तम संरक्षक आणि सर्वोत्तम आक्रमक हा पुरस्कार देण्यात आला.


कुमार गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं दिल्लीचा 11-9 असा पराभव करून 32 व्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या सामन्यात महाराष्ट्राच्या आदित्य कुदळे (2:30 मिनिटं संरक्षण आणि पाच गडी), सूरज झोरे (नाबाद 1:10 मिनिटं, नाबाद 3:40 मिनिटं संरक्षण आणि दोन गडी), किरण वासावे (1:40 मिनिटं, 3:10 मिनिटं संरक्षण आणि एक गडी), सिराज भावे (1:30 मिनिटं, 1:50 मिनिटं संरक्षण), विवेक ब्राम्हणे (तीन गडी) यांनी यांच्या बहारदार खेळानं महाराष्ट्राचा विजय सुकर झाला.


कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं कोल्हापूरवर 12-9 अशी मात करून 23 व्यांदा विजेतेपद पटकावलं. महाराष्ट्राच्या अश्विनी शिंदे (2:40 मिनिटं, 3:50 मिनिटं संरक्षण), अंकिता लोहार (2:40 मिनिटं, 3:50 मिनिटं संरक्षण), संपदा मोरे (1:30 मिनिटं संरक्षण आणि दोन बळी), दीपाली राठोड (1:10 मिनिटं संरक्षण आणि दोन बळी), वृशाली भोये (दोन बळी) यांनी महाराष्ट्राला सहज विजय मिळवून दिला. कोल्हापूरच्या श्रेया पाटील (1 मिनिट, 2:10 मिनिटं संरक्षण आणि एक बळी), स्नेहा होणमुटे (1:40 मिनिटं, 1:50 मिनिटं संरक्षण आणि एक बळी), वैष्णवी पोवार (1:40 मिनिटं, 1:30 मिनिटं संरक्षण) करताना दिलेली झुंज कौतुकास्पद ठरली.