Maharashtra Kho Kho Team : उस्मानाबाद येथे 55 वी राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला स्पर्धा सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात पुरुषांनी उत्तराखंडवर तर महिलांनी अरुणाचल प्रदेशवर विजय मिळवला आहे. भारतीय खोखो महासंघ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी मिळून उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात 24 नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे. 


पुरुषांचा 17-7 ने विजय


पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तराखंडवर 17-7 असा दमदार विजय मिळवला. महाराष्ट्राच्या रामजी कश्यप आणि प्रतीक वाईकर (प्रत्येकी 2.40 मि. संरक्षण आणि 1 गुण), अक्षय मासाळ (2.10 मि‌. संरक्षण आणि 3 गुण), लक्ष्मण गवस (2.10  मि. संरक्षण आणि 2 गुण), सुरज शिंदे (2.20 मि. संरक्षण) आणि गजानन शेंगाळ (3 गुण) यांनी आपल्या शानदार खेळाने महाराष्ट्राला एका डावाने विजय मिळवून दिला. पराभूत उत्तराखंडच्या शशिकांतने एकहाती लढत दिल्याचं पाहायला मिळालं. 


महिलांचा 18.3 ने दमदार विजय


महिलांच्या सामन्यात महाराष्ट्राने अरुणाचल प्रदेशचा 18-3 असा एक डाव 15 गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळे (5 गुण), स्नेहल जाधव (नाबाद 2 मि. संरक्षण आणि 2 गुण), प्रतीक्षा बिराजदार (2:40  मि. संरक्षण), प्रीती काळे आणि श्रेया सनगरे (प्रत्येकी २:१० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (4 गुण), दिपाली राठोड (3 गुण), अपेक्षा सुतार आणि पूजा फरगटे (प्रत्येक 2 गुण) यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्राला मोठा विजय मिळवणे सहज शक्य झालं. 


अन्य निकाल कसे?


महिलांच्या दुसऱ्या एका सामन्यात गोव्याने सीमा सुरक्षा बलचा 18-4 असा एक डाव 14 गुणांनी धुवा उडवला. गोव्याच्या काशी गांवकरने 4.20 मि. संरक्षण आणि 3 गुण, अश्विनी वेळीपने 4.30 मि. संरक्षण आणि 2 गुण, दीप्ती वेळीपने नाबाद 4.30 मि. संरक्षण करून विजयात मोलाची कामगिरी बजावली. तर पराभूत सीमा सुरक्षा बलच्या अश्विनी चव्हाणने एकाकी लढत दिली. तसंच पुरुषांच्या एका सामन्यात विदर्भाने दुबळ्या जम्मू-काश्मीरचा 23-8 असा एकतर्फी विजय मिळवला. अक्षय उमाते, दिलराजसिंग सेनगर, राज सिसोदिया त्यांनी चांगला खेळ केला . कोल्हापूरच्या महिलांनी सुद्धा जम्मू काश्मीर वर 32-6 असा एक डाव 26 गुणांनी धुवा उडवला आणि पुरुषांच्या सामन्यात कोल्हापूरने त्रिपुराचा 28-8 असा एक डाव 20 गुणांनी पराभव केला.



हे देखील वाचा- 


Qatar vs Ecuador FIFA WC : फिफामध्ये इक्वाडोरची विजयी सुरुवात, यजमान कतारवर 2-0 नं मात