नागपूरभारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 205 धावांत गुंडाळून, नागपूर कसोटी टीम इंडियाच्या बाजूने झुकवली. या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली होती. त्यामुळे श्रीलंकेला फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चंडिमलने चौथ्या विकेटसाठी केलेल्या 62 धावांच्या भागिदारीचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या डावात मोठी भागीदारी झाली नाही. करुणारत्नेने 51, तर चंडिमलने 57 धावांची खेळी केली.


ईशांत शर्माने तीन, रवीचंद्रन अश्विनने चार आणि रवींद्र जाडेजाने तीन फलंदाजांना माघारी धाडून श्रीलंकेचा 205 धावांत खुर्दा उडवला. त्यानंतर भारताने पहिल्या दिवसअखेर एक बाद 11 धावा केल्या. लाहिरू गमगेने लोकेश राहुलचा सात धावांवर त्रिफळा उडवला. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा दोघेही 2 धावांवर खेळत आहेत.

उपहारापर्यंतचा खेळ

नागपूरच्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेनं पहिल्या सत्रात उपाहारापर्यंत 2 बाद 47 धावांची मजल मारली. सलामीच्या समरविक्रमाला सुरुवातीलाच माघारी धाडत इशांत शर्मानं श्रीलंकेला पहिला धक्का दिला.

इशांतने समरविक्रमाला चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद केलं. समरविक्रमाने 13 धावा केल्या. पहिली विकेट गेली त्यावेळी श्रीलंकेच्या 4.5 षटकात 1 बाद 20 अशी धावसंख्या होती.

त्यानंतर दिमुथ करुणारत्ने आणि लाहिरु थिरीमनेनं श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र रवीचंद्रन अश्विननं थिरीमनेला माघारी धाडत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला.

पहिल्या सत्रातील खेळ थांबला तेव्हा करुणारत्ने 21 तर अँजेलो मॅथ्यूज एका धावेवर खेळत होते.

भारतीय संघात 3 बदल

दरम्यान, भारताने नागपूर कसोटीसाठी संघात तीन बदल केले आहेत. सलामीवीर शिखर धवनने माघार घेतल्यामुळे अपेक्षेप्रमाणे मुरली विजयला संधी देण्यात आली आहे.

याशिवाय किरकोळ दुखापतीमुळे मोहम्मद शमी बाहेर पडला आहे, त्याच्या जागी ईशांत शर्माची निवड झाली आहे.

तर बोहल्यावर चढल्यामुळे भुवनेश्वर कुमार दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी कोणी गोलंदाज खेळवण्याऐवजी विराट कोहलीने रोहित शर्माला पसंती दिली आहे.

त्यामुळे भारतीय संघ या कसोटीत चार गोलंदांज, 6 फलंदाज आणि एक विकेटकिपर असा ताफा घेऊन मैदानात उतरला आहे.

नव्या स्टेडियमवर सामना

भारत आणि श्रीलंका संघांमधली ही कसोटी नागपूरमधील जामठ्याच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या स्टेडियमची खेळपट्टी ही दिवसागणिक फिरकी गोलंदाजीच्या आहारी जाते अशी तिची ख्याती आहे. जामठ्याच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवर 2008 सालापासून आजवर झालेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये शंभरहून अधिक विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या आहेत.

पण भारत-श्रीलंका कसोटी सामन्याच्या निमित्तानं इथल्या खेळपट्टीची ओळख बदलण्याचा, किंबहुना ती वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरावी असा सल्ला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं दिला आहे.

कोलकाता कसोटीत श्रीलंकेनं ढगाळ हवामानाचा आणि ओल्या खेळपट्टीचा लाभ उठवून टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या १७२ धावांत गुंडाळला होता. पण एरवी दिनेश चंडिमलचा हा संघ विराट कोहलीच्या टीम इंडियाच्या तुलनेत ताकदीनं दुबळा मानला जातो. त्यामुळं श्रीलंकेविरुद्धच्या  प्रत्येक सामन्याकडे टीम इंडिया जानेवारी-फेब्रुवारीतल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून पाहात आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या वेगवान आणि बाऊन्सी खेळपट्ट्या लक्षात घेता भारतीय संघाचा आगामी दौरा अतिशय खडतर आणि आव्हानात्मक असणार आहे.

टीम इंडियानं कोलकाता कसोटी गाजवणाऱ्या भुवनेश्वर कुमारला लग्नासाठी, तर शिखर धवनला वैयक्तिक कारणासाठी तात्पुरती रजा दिली आहे. भुवनेश्वरऐवजी ईशांत शर्माला, तर शिखर धवनऐवजी मुरली विजयला नागपूर कसोटीसाठी संधी मिळाली आहे.

भारताच्या अंतिम संघात संधी कुणालाही मिळो, त्यांच्यासाठी श्रीलंकेविरुद्धची कसोटी हे केवळ निमित्त असणार आहे. टीम इंडियाच्या साऱ्या शिलेदारांचं लक्ष्य हे मिशन दक्षिण आफ्रिकाच राहिल.

सिद्धेश कानसेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा

https://twitter.com/BCCI/status/933901617065181184