Lakshya Sen News : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) याने आपल्या वयाबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली असून शहरात बॅडमिंटन अकादमी चालवणारे नागराज एम.जी. यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, 'लक्ष्य सेन याचा जन्म 1998 मध्ये झाला होता, मात्र त्याने चुकीच्या पद्धतीने 2001 ही जन्मतारीख नमूद केली होती. खोटी कागदपत्रे तयार करून आरोपीने इतर खेळाडूंची फसवणूक करून शासनाकडून चुकीच्या पद्धतीने फायदा मिळविल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.'


बंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्यचे वडील धीरेंद्र कुमार सेन, त्याची आई निर्मला सेन, भाऊ चिराग सेन आणि प्रशिक्षक विमल कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. धीरेंद्र कुमार सेन हे बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत, तर लक्ष्यचा भाऊ चिराग सेन हा देखील बॅडमिंटनपटू आहे. यंदा झालेल्या बर्मिंगहम येथील कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Gams 2022) स्पर्धेत लक्ष्य सेन याने कमाल कामगिरी करत भारताची पदक संख्या वाढवण्यात मोलाची कामगिरी पार पाडली होती.


लक्ष्यच्या भावावरही आरोप


लक्ष्य आणि त्याचा भाऊ चिराग या दोघांच्या जन्माच्या दाखल्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कर्नाटक बॅडमिंटन असोसिएशन विमल कुमार आणि प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीच्या प्रशिक्षकांच्या संगनमताने दोघेही कमी वयोगटातील प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2010 पासून हे सर्व होत असल्याचंही तक्रारीत नमूद आहे. तक्रारदार नागराजू यांनी ही तक्रार दाखल केली असून आता तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 420, 468, 471 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्य सेन याला नुकतंच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.


कॉमनवेल्थ स्पर्धेत मिळवलं होतं गोल्ड


बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं बर्मिंगहमध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्याने मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग (Tze Yong Ng) याला मात देत विजय मिळवला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात सेननं तीन पैकी दोन सेट जिंकत19-21, 21-9, 21-16 च्या फरकाने सामना जिंकला आहे.   


हे देखील वाचा-


Arjuna Award 2022 : लक्ष्य सेनसह कॉमनवेल्थ गाजवणारे खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस, वाचा सविस्तर यादी