Korea Open 2022: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि किदाम्बी श्रीकांत (Srikanth Kidambi) यांनी कोरिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिलीय. सिंधूनं जपानच्या अया ओहोरी आणि श्रीकांतनं इस्रायलच्या मिशा झिलबरमनला पराभूत केलाय. तर, भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि मालविका बनसोड (Malvika Bansod) यांना दुसऱ्या फेरीत पराभव पत्कारावा लागलाय. 


जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूनं ओहोरीविरुद्ध सरळ गेममध्ये विजय मिळवला. तिने 26व्या क्रमांकाच्या जपानी खेळाडूचा 21-15, 21-10 असा पराभव केला.  या दोघांमध्ये आतापर्यंत 12 सामने खेळले गेले आहेत. सिंधूनं आतापर्यंतच्या कारकिर्दीत ओहोरीविरुद्ध एकही सामना गमवलेला नाही. या विजयासह सिंधूनं ओहोरीविरुद्ध तिची विजयी घौडदौड कायम ठेवली.


उपांत्यपूर्व फेरीत सिंधू बुसानन ओंगबामरुंगफानशी भिडणार
सिंधूचा पुढचा सामना थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानशी होणार आहे. गेल्या महिन्यात स्विस ओपनच्या अंतिम फेरीत हे दोन्ही खेळाडू आमनेसामने आले होते. त्या सामन्यात सिंधूनं बुसाननचा पराभव केला होता. सिंधूनं या वर्षी आतापर्यंत दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. स्विस ओपन व्यतिरिक्त तिनं सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. सिंधू आणि बुसानन यांच्यात आतापर्यंत 17 सामने झाले आहेत. यापैकी सिंधूनं 16 सामने जिंकले आहेत. तर, फक्त एका सामन्यात सिंधूला पराभूत करण्यात बुसाननला यश आलंय. 


किदाम्बी श्रीकांतची दमदार कामगिरी
दरम्यान, श्रीकांतनं मिशा झिलबरमनचा 21-18, 21-6 अशा फरकानं पराभव केला. या स्पर्धेतील त्याचा पुढचा सामना कोरियाच्या सोन वान याच्याशी होणार आहे. सोन वान यानं आपल्या खेळीच्या जोरावर क्रिडाविश्वावर छाप सोडली आहे. या स्पर्धेच्या विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. 


लक्ष्य सेन आणि मालविका बनसोडचा पराभव
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या लक्ष्य सेनला कोरिया ओपनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला इंडोनेशियाच्या शेसर हिरेन रुस्ताविटोकडून  22-20, 21-9 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला. तर, भारताची प्रकाश झोतात येत असलेली मालविका बनसोडल उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवण्यास अपयशी ठरली. थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगनं तिला 8-21, 14-21 च्या फरकानं पराभूत केलंय. 


हे देखील वाचा-