नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या मागच्या दौऱ्यातलं अपयश यंदा धुवून काढण्याचा चंग बांधला आहे. टीम इंडिया ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. या मालिकेच्या पूर्वतयारीसाठी विराट कोहलीने इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या कौंटी मोसमात विराट कोहली सरेचं प्रतिनिधित्व करताना दिसेल. त्यासाठी विराट जूनमध्येच इंग्लंडला रवाना होईल. परिणामी त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याला मुकावं लागणार आहे. ही कसोटी 14 ते 18 जून या कालावधीत बंगळुरूत खेळवण्यात येणार आहे.
2014 साली इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहली अपयशी ठरला होता. 5 कसोटी सामन्यांमध्ये त्याला केवळ 13.40 च्या सरासरीने 134 धावा करता आल्या. मात्र यावेळी हे आकडे बदलण्याचा निश्चय त्याने केला आहे.
दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेमध्ये जी चूक झाली, ती इंग्लंडमध्ये होणार नाही, हे विराटने आयपीएलपूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इंग्लंडमधील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तो अगोदरच रवाना होणार आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात आयपीएल खेळल्यानंतर टीम इंडिया जून अखेर परदेश दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. जूनमध्ये आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळल्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. या दौऱ्यात 5 कसोटी, 3 वन डे आणि 3 टी-20 सामन्यांचा समावेश आहे.
इंग्लंडचा बदला घेण्याची तयारी, विराट कौंटी क्रिकेटमध्ये खेळणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Mar 2018 12:21 AM (IST)
टीम इंडिया ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. या मालिकेच्या पूर्वतयारीसाठी विराट कोहलीने इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -