Khelo India Youth Games 2022 : पंजाब युनिर्व्हिसिटीच्या मैदानावर झालेल्या आर्चरीमध्ये साताऱ्याच्या आदिती स्वामीने सुवर्णवेध घेतला. कम्पाउंड राऊंडमध्ये तिने हे यश मिळवले. अहमदनगरच्या पार्थ कोरडे याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आदितीने पंजाबच्या अवनित कौर हिचा पराभव केला. आदितीचा स्कोर १४४ होता तर अवनित १३७ गुणांवर होती. आदितीने घेतलेल्या आघाडीमुळे महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळाले. ती साताऱ्याच्या दृष्टी अकादमीत सराव करते. प्रवीण सावंत हे तिचे मार्गदर्शक आहेत.


दुसरे पदक अहमदनगरच्या पार्थने मिळवून दिले. पार्थ आणि आंध्र प्रदेशच्या व्यंकीसोबत अंतिम सामना झाला. पार्थची सुरूवात खराब झाली. त्यामुळे तो काहीसा पिछाडीवर पडला. शेवटी पार्थ स्कोर होता १४४ तर आंध्रप्रदेशच्या व्यंकी अवघा एका गुणाने (१४५) पुढे राहिला. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तो अहमदनरमधील अभिजीत दळवी यांच्या अकादमीचा खेळाडू आहे. इतर स्पर्धकांना पदकापर्यंत पोचता आले नाही. नीतू इंगोले (अमरावती) या आर्चरी संघाच्या प्रशिक्षक होत्या. सायंकाळी टेबल टेनिस, बॉक्सिंग, जलतरण आणि खो-खोचे सामने होणार आहेत.


बॉक्सिंगमध्ये मुलांची फाईट
बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगलीच लढत दिली. तब्बल नऊ खेळाडूंनी सेमीफायनल गाठली. सिमरन वर्मा, रिशिका होले, साई डावखर, आदित्य गौंड, माणिक सिंग, कुणाल घोरपडे, सुरेश विश्वनाथ, विजयसिंग, व्हिक्टर सिंग यांनी विविध गटांतील सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. त्यातील व्हिक्टर सिंगने सकाळी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित सामने होत आहेत. त्यांना प्रशिक्षक सतीश भट, विजय डोबाळे, सागर जगताप यांचे मार्गदर्शन मिळाले.


जलतरणमध्येही सुवर्ण सूर - 
जलतरणमध्ये अपेक्षा फर्नांडिसने 200 मीटरमध्ये विक्रमी कामगिरी केली. तिने 2.25.10 अशी विक्रमी वेळ नोंदवली. यापूर्वी किनिषा गुप्ताचा 2.25.80 असा विक्रम होता. 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये भक्ती वाडकर, अपेक्षा फर्नांडिस, संजिती साहा, आन्या वाला यांचा संघ होता. पलक जोशीने 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य (2.27.01), रिषभ दासने 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य (2.12) पदक पटकावले. मल्लखांबमध्ये वैयक्तिक प्रकारात प्रणाली मोरेने कांस्य पदक मिळवले.