मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फिटनेसबाबत किती जागरुक आहे, याची सर्व चाहत्यांना कल्पना आहे. आहार आणि व्यायामाबाबत काटेकोर असलेल्या कोहलीला आता कडकनाथ कोंबडा खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कृषी विज्ञान केंद्राकडून विराटला हा सल्ला देण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील झाबुआमधल्या कृषी विज्ञान केंद्राकडून 'बीसीसीआय' आणि विराट कोहली याला पत्र लिहून हा सल्ला देण्यात आला आहे. कडकनाथ कोंबड्यात कोलेस्ट्रॉल आणि चरबीचं प्रमाण कमी असल्यामुळे हा सल्ला देण्यात आला आहे.

'विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू ग्रील्ड चिकन खातात, याची माहिती आम्हाला मीडियातून मिळाली. मात्र कोलेस्ट्रॉल आणि फॅट्सचं अतिरिक्त प्रमाण असल्यामुळे तुम्ही वेगन (प्राणिजन्य पदार्थांचा त्याग करणारे) डाएट आत्मसात केल्याचं समजलं.' असं या पत्रात म्हटलं आहे.

'राष्ट्रीय संशोधन केंद्रानुसार झाबुआतील कडकनाथ कोंबड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट्सचं प्रमाण अत्यल्प असतं, तर लोह आणि प्रथिनांचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे इथल्या कडकनाथ कोंबड्यांचा समावेश आपल्या आहारात करावा' अशी विनंती झाबुआ कृषी विज्ञान केंद्राने केली आहे.

भारत ऑणि ऑस्ट्रेलिया संघांमधला अखेरचा कसोटी सामना सिडनीत खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना गुरुवारी पहाटे पाच वाजता सुरु होईल. उभय संघातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 अशा आघाडीवर आहे.



भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियन भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. 1947 पासून आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आलेल्या अकरापैकी आठ मालिका कांगारुंनी जिंकल्या तर आहेत तीन मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. त्यामुळे विराट कोहलीची टीम इंडिया सिडनी कसोटीत मालिकाविजयाच्या निर्धारानेच मैदानात उतरेल.