नवी दिल्ली : विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकांच्या विलिनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. देशातील बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन बँकांचं मर्जर होणार आहे. एक एप्रिलपासून हे विलिनीकरण लागू होणार आहे.


मर्जरनंतर बँकेची उलाढाल 14.82 लाख कोटींच्या घरात जाईल. नव्याने विलीन झालेली ही बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (एसबीआय) नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून अस्तित्वात येईल.

या विलिनीकरणाचा प्रभाव कर्मचाऱ्यांवर होणार नाही. मात्र तिन्ही बँकांच्या बॅलन्स शीटवर याचा प्रभाव पडणार आहेच, शिवाय तुमचं खातं या तीनपैकी एखाद्या बँकेत असेल, तर तुम्हीसुद्धा प्रभावित होणार आहात.

ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तुम्हाला नवीन खाते क्रमांक (अकाऊण्ट नंबर) आणि कस्टमर आयडी मिळण्याची शक्यता आहे. तुमचा ईमेल आयडी आणि फोन नंबर अपडेटेड असल्यास, कोणत्याही बदलाची सूचना तुम्हाला तात्काळ मिळेल.

समजा तुमचं खातं देना आणि विजया या दोन्ही बँकांमध्ये असेल, तर तुमचे खाते क्रमांक वेगवेगळे असतील, मात्र एकच कस्टमर आयडी मिळेल. ज्यांना नवीन कस्टमर आयडी किंवा IFSC कोड मिळतील, त्यांना इन्कम टॅक्स, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, एनपीएस यासारख्या थर्ड पार्टीसोबत ते अपडेट करावे लागतील.

देना, विजया आणि बँक ऑफ बडोदाच्या काही स्थानिक शाखा बंद होऊ शकतात. त्यानंतर तुमचं खातं दुसऱ्या जवळच्या शाखेत वर्गीकृत करण्यात येईल.