Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला. दक्षिण कोरियाचा 2-1 ने पराभव करच टीम इंडियाने चषकावर नाव कोरले. या स्पर्धेत अन्नू हिने आपल्या कामगिरीने प्रभावित केले. एकापाठोपाठ एक गोल मारत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. यशाच्या शिखरावर पोहचलेल्या अन्नूचा संघर्ष मोठा आहे. कठीण परिस्थितीला सामोरं जात यशाला गवसणी घातली. आपल्यासाठी उपाशी झोपणाऱ्या आई-वडिलांना ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला, ही खंत अन्नूच्या मनात राहिली. आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर आता काय करणार.. असे विचारले असता अन्नूने आपल्या आई-वडिलांना स्मार्टफोन घेऊन देणार असे सांगितले.
आशिया चषकात भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने चमकदार कामगिरी केली. अन्नूने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. अन्नूच्या दमदार कामगिरच्या बळावरच भारताने चार वेळच्या विजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केला. अंतिम सामन्यात अन्नूने पहिला गोल करत टीम इंडियाच्या खेळाडूंना सकारात्मक उर्जा दिली. अन्नूने या स्पर्धेत सर्वाधिक 9 गोल केले आहेत. दोन वेळा प्लेअर ऑफ द मॅच होण्याचा मानही तिने पटकावलाय.
हरियाणातील जींद जिल्ह्यातील रोजखेडा या छोट्या गावात अन्नू कुटुंबासोबत राहते. अन्नू म्हणाली की, 'फायनलचा सामना आई-बाबा पाहू शकले नाहीत, हे दु:ख नेहमीच राहिल. त्यांच्याकडे स्मार्टफोन नसल्यामुळे ते लाईव्ह सामना पाहू शकले नाहीत. आता घरी गेल्यानंतर सर्वात आधी स्मार्टफोन घेऊन देणार... जेणेकरुन यापुढे असे होणार नाही. ' आम्ही खूप कठीण दिवस पाहिलेत. बाबा शेतात मजुरी करायचे तर कधी वीटभट्टीवर काम करत होते. आई आजारपणाने खिळली होती. त्यामुळे अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागले. मैदानावर खेळताना नेहमीच आई-बाबांचा संघर्ष डोळ्यासमोर येत होता, असे अन्नु म्हणाली.
भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप गमावली, त्याच दिवशी भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरले. क्रिकेटपेक्षा इतर खेळाडूंना माध्यमात कमी महत्वं दिले जाते... त्यादिशीह असेच झाले. अन्नु म्हणाली की, भारतात सर्वजण क्रिकेटला पसंत करतात... ज्युनिअर हॉकीला अद्याप तितकी ओळख मिळाली नाही. या सामन्याने एक दिवस का असेना... पण परिस्थिती बदलली. लोकांचे विचार बदलतील, आमच्या कामगिरीचेही कौतुक होईल, अशी आशा आहे.
दोन लाखांचे बक्षीस -
किताब जिंकणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला रोख दोन लाख रुपये देण्याची घोषणा हॉकी इंडियाने केली. यासोबतच त्यांनी सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 1 लाख रुपये देण्याचीही घोषणा केली. भारतीय संघ अजिंक्य राहिला आणि या वर्षी चिली येथे होणाऱ्या ज्युनिअर विश्वचषक 2023मध्येही स्थान मिळवले.