Jonty Rhodes Viral Catch : आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग 2025 चा 11 वा सामना ऑस्ट्रेलिया मास्टर्स आणि दक्षिण आफ्रिका मास्टर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 137 धावांनी पराभव केला. कर्णधार शेन वॉटसनने या स्पर्धेतील तिसरे शतक झळकावले आणि 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॉन्टी ऱ्होड्सने आपल्या क्षेत्ररक्षणाने पुन्हा एकदा तारुण्याची आठवण करून दिली. जॉन्टी ऱ्होड्स त्याच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणासाठी आजही क्रिकेटप्रेमींच्या तोंडी आहे. हवेतील झेल टिपण्यासाठी तो प्रसिद्ध होता. आता रोड्सने इंटरनॅशनल मास्टर्स लीगमध्येही आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले, त्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.






जॉन्टी ऱ्होड्स वयाच्या 55​​व्या वर्षी झेपावला 


इंटरनॅशनल मास्टर्स लीगने सोशल मीडियाच्या सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म X वर जॉन्टी रोड्सचा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये शेन वॉटसन एक फ्रंट शॉट खेळत आहे. चेंडू सीमारेषेबाहेर जात आहे, पण जॉन्टी ऱ्होड्स धावत येतो आणि चेंडूला सीमारेषा ओलांडण्यापासून रोखण्यासाठी हवेत झेप घेतो. वयाच्या 55 व्या वर्षी जॉन्टीने आपल्या अप्रतिम फिटनेसने सर्वांना चकित केले. तो अजूनही किती तंदुरुस्त आहे हे त्याने दाखवून दिले. जॉन्टी ऱ्होड्स हा त्याच्या काळातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानला जात असे.






दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार जॅक कॅलिसने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया मास्टर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 1 गडी गमावून 260 धावा केल्या. वॉटसनने नाबाद 122 आणि फर्ग्युसनने 85 धावा केल्या. तर बेन डंकने नाबाद 34 धावांची झटपट खेळी खेळली.


261 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका मास्टर्स संघ 17 षटकांत सर्वबाद 123 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम आमलाने सर्वाधिक 30 धावा केल्या. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका मास्टर्सचा सामना 137 धावांनी गमवावा लागला.


इतर महत्वाच्या बातम्या