Shreyas Iyer and Ishan Kishan : आंतरराष्ट्रीय मालिकांपासून दूर असलेल्या श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे रणजी ट्रॉफीपासून अंतर कायम ठेवले आहे. आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 सीझनच्या आधी किशन तयारी करत आहे, अय्यरला पाठीच्या किरकोळ दुखण्याशी सामना करावा लागत आहे. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) किशन आणि अय्यर यांच्यावर पूर्णपणे खूश नाहीत. त्यामुळे या दोघांनाही नवीन केंद्रीय करार यादीतून वगळण्याची शक्यता आहे.






टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अय्यर आणि किशन या दोघांना 2023-24 हंगामासाठी केंद्रीय करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामागे बोर्डाच्या आग्रहानंतरही त्यांची देशांतर्गत क्रिकेटमधून अनुपस्थिती कारणीभूत ठरली आहे. अजित आगरकरांच्या नेतृत्वाखालील समितीने 2023-24 हंगामासाठीही केंद्रीय करारबद्ध खेळाडूंची यादी जवळजवळ अंतिम केली आहे, जी बीसीसीआय लवकरच जाहीर करणार आहे. 






किशन आणि अय्यर यांना त्या यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे, कारण बीसीसीआयच्या आदेशानंतरही दोघेही देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत, असे सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे. अय्यर पाठीच्या समस्येमुळे इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला होता.


अय्यरला पाठदुखीच्या तक्रारीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून शेवटच्या तीन कसोटींसाठी भारताच्या संघातून वगळण्यात आले होते. गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात अय्यर हा भारताच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फलंदाजांपैकी एक होता. तो फक्त रणजी सामना चुकवल्यामुळे तो करार गमावणार नाही, असेही म्हटले जात आहे. 


2022-23 च्या केंद्रीय करारानुसार, इशान किशनला C श्रेणीमध्ये ठेवण्यात आले होते, तर श्रेयस अय्यर B मध्ये होता. त्यामुळे अनुक्रमे त्यांनी 1 कोटी आणि 3 कोटी रुपयांची कमाई केली होती.


इतर महत्वाच्या बातम्या