कोलकाता : टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या एका ट्विस्ट ट्विटने चर्चेचा धुरळा क्रिकेट जगतापासून पार दिल्लीपर्यंत उडाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गांगुली यांच्या ट्विटनंतर राजीनामा दिल्याचे वृत्त पसरल्यानंतर तातडीने खुलासा केला. गांगुली यांनी पदाचा राजीनामा दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.  


सौरव गांगुली यांची पोस्ट वाचल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. गांगुली गेल्यावर्षी झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राजकीय चेहरा म्हणून दिसणार होते, पण तब्येतीच्या समस्येमुळे निर्णय होऊ शकला नाही. आता मात्र, सौरव राजकारणाच्या नव्या इनिंगमध्ये आपली कारकीर्द घडवणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यामुळेच त्यांनी एवढ्या मोठ्या पदाचा राजीनामा दिला असावा. गांगुली यांनी राजीनामा अशा वेळी दिला आहे जेव्हा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका आणि त्यानंतर आशिया कप 2022आणि त्यानंतर टी-20 विश्वचषक सुरू होणार आहे. 


गांगुली यांनी केलेल्या ट्विटनंतर त्यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली. तथापि, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, गांगुलींचा निर्णय राजकीय असल्याची चर्चा रंगली आहे. कारण बंगाल निवडणुकीपासून भाजप त्यांच्या संपर्कात आहे. गांगुली यांची भाजपच्या साक्षीने बंगालमध्ये राजकीय  इनिंग सुरु होणार का ? याची चर्चा सुरु झाली आहे. बंगालमध्ये भाजप राजकीय चेहऱ्याच्या शोधात आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी गांगुली यांच्याकडे भाजप प्रवेशासाठी सातत्याने चाचपणी केली आहे. 


अलीकडेच कोलकातामधील व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांगुली यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी अमित शहा सौरव गांगुली यांच्या निवासस्थानी सुद्धा गेले होते.दोघांनी सोबत डिनरही केले होते.यावेळी सुवेंदू अधिकारी तसेच अन्य बंगाली भाजप नेते सुद्धा डिनरमध्ये सहभागी झाले होते. तेव्हाही गांगुलींच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र,त्यांनी त्यावेळी सीएम ममतांचे कौतुक करून गुगली टाकली होती.






आज ट्विटरवर ट्विस्ट केलेल्या ट्विटने एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणतात, 1992 मध्ये  क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर 2022 मध्ये 30 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हापासून क्रिकेटनं मला खूप काही दिलं आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांचा मला पाठिंबा मिळाला आहे. या प्रवासाचे साक्षीदार राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी धन्यवाद देऊ इच्छितो. ज्यांनी मी आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पाठिंबा दिला आणि मदत केली.आज अशा नियोजनाची सुरुवात करत आहे ज्यामुळे अनेक लोकांना फायदा होईल.मला आशा आहे आजवर जसा आपला पाठिंबा राहिला आहे तसाच सर्वांचा पाठिंबा राहिल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या