मुंबई: साई रिसॉर्ट प्रकरणी राज्य सरकारने काय कारवाई केली याचा अहवाल सादर करावा असे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्याला दिले आहेत. दापोलीतील साई रिसॉर्ट हे राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. 


केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आज हे पत्र पाठवलं आहे. त्यामध्ये साई रिसॉर्टवर काय कारवाई केली याची डिटेल माहिती सादर करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून त्यामुळे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण खात्याकडे केला होता. त्याच आधारे अनिल परब यांच्यावर ईडीने छापेमारी केली असल्याचं सांगितलं जातंय. 


संबंधित रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून त्याचे बांधकाम करताना पर्यावरण खात्याच्या काही मंजुरी घेण्यात आल्या नसल्याचा ठपका केंद्रीय पर्यावरण खात्याने ठेवला होता.  त्यामुळे सीआरझेडच्या कायद्याचं उल्लंघन झालं असल्याचं सांगत केंद्राने या आधी राज्याला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. आता त्याच निर्देशांवर काय कारवाई केली याचा अहवाल देण्याचा आदेश दिला आहे. 


ते रिसॉर्ट माझं नाही; अनिल परब यांचा दावा
काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यावेळी साई रिसॉर्टबद्दल अनिल परब यांची चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या छापेमारीनंतर अनिल परब माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर आणि माझ्याशी संबंधित छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. दापोलीचे साई रिसॉर्ट हे सदानंद कदम आहेत, तसा दावा त्यांनी कोर्टात केला आहे, तसे सर्व कागदपत्रे ही त्यांनी जमा केली आहेत. हे रिसॉर्ट अजून सुरू झालं नाही. तरीही या रिसॉर्टमधून पाणी हे समुद्रात जात असल्याचा आरोप करत केंद्रीय पर्यावरण खात्याने तक्रार केली. त्याच तक्रारीवरुन ईडीची आजची कारवाई आहे. हे रिसॉर्ट सुरूच नाही तर कारवाई कशी केली जाते हा प्रश्न आहे."