Irfan Pathan : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी (28 फेब्रुवारी) खेळाडूंची वार्षिक करार यादी जाहीर केली. बीसीसीआयने एकूण 30 खेळाडूंचा करार यादीत समावेश केला आहे. A+ श्रेणीमध्ये चार खेळाडूंना, A मध्ये सहा, B श्रेणीमध्ये पाच आणि C श्रेणीमध्ये सर्वाधिक 15 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. खेळाडूंसोबत हा करार ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024 पर्यंतचा आहे.
इरफानकडून हार्दिक पांड्याबद्दल प्रश्न उपस्थित
वार्षिक करारात श्रेयस अय्यर आणि इशान किशनला स्थान मिळालेले नाही. दोन्ही खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे शिक्षा झाली आहे. माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला वार्षिक करार न देण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे.
तर भारतीय क्रिकेटला अपेक्षित परिणाम साधता येणार नाहीत
बीसीसीआयवर निशाणा साधत इरफान म्हणाला की हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंसाठी हे प्रमाण का नाही?बीसीसीआयने इशान आणि श्रेयसला दणका देतानाच 2018 पासून एकही कसोटी न खेळलेल्या पांड्याला ग्रेड-ए करार दिला आहे.
इरफानने ट्विटरवर लिहिले की, 'इशान किशन आणि श्रेयस अय्यर प्रतिभावान क्रिकेटर आहेत आणि आशा आहे की ते जोरदार पुनरागमन करतील. हार्दिक सारख्या खेळाडूला लाल चेंडूचे क्रिकेट (कसोटी) खेळायचे नसेल तर त्याने आणि त्याच्यासारख्या खेळाडूंनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना पांढऱ्या चेंडूच्या (वनडे) देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग का घेऊ नये? हे सर्वांना लागू होत नसेल, तर भारतीय क्रिकेटला अपेक्षित परिणाम साधता येणार नाहीत.
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौरा सोडल्यानंतर इशान किशन झारखंडकडून रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी आला नव्हता. त्याने आयपीएलची तयारी सुरू केली, ज्यामध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. बडोद्याविरुद्ध रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीत खेळण्यासाठी श्रेयस अय्यरही मुंबई संघात सामील झाला नाही. कंबरेच्या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाबाहेर होता.
इरफान पठाणची कारकिर्द
इरफानने 2003 ते 2008 दरम्यान टीम इंडियासाठी 29 कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला होता. या काळात त्याने 31.57 च्या सरासरीने 1105 धावा करण्यासोबतच 100 विकेट्सही घेतल्या. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने सात वेळा एका डावात पाच विकेट्स आणि एका सामन्यात दोन वेळा दहा बळी घेतले. याशिवाय इरफान पठाणने 120 एकदिवसीय आणि 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला.
एकदिवसीय सामन्यात इरफान पठाणने पाच अर्धशतकांच्या मदतीने 1544 धावा केल्या आणि 173 बळी घेतले. T20 मध्ये 28 विकेट्स व्यतिरिक्त इरफान पठाणच्या नावावर एकूण 172 धावांची नोंद आहे. एवढेच नाही तर इरफान पठाणने जम्मू-काश्मीर संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. इरफान पठाणने उमरान मलिक आणि अब्दुल समद यांसारख्या युवा खेळाडूंना सुधारण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या