मुंबई : नागराज मंजुळे हे नाव अस्सल मराठी असूनही देशभरात पोचलं. फॅंड्री, सैराट अशा चित्रपटांमधून त्याने आपलं दिग्दर्शकीय कौशल्य सिद्ध केलं. आता तर अमिताभ बच्चन यांच्यासोबत तो नवा चित्रपट घेऊन येतो आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे झुंड. याशिवाय नागराज चित्रपटातून अभिनयही करतो. यापूर्वी सायलेन्स, नाळ अशा चित्रपटातून त्याने अभिनय केला आहे. पण आता आणखी एका चित्रपटातून तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे तार.


खाकी शर्ट, खाकी पॅंट, टोपी खांद्यावर अडकलेली खाकी पिशवी, आणि त्यात पत्रांचा गठ्ठा. त्यावरचा पत्ता वाचून घराघरापर्यंत पत्र पोहोचवणारा पोस्टमन आपल्या प्रत्येकाच्याच डोळ्यासमोर नेहमी उभा राहतो. असा पोस्टमन बनून नागराज मंजुळे शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पोस्टमन पोस्टमनचा आयुष्याची कथा सांगणार आहे.


बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि नागराज मंजुळे लवकरच काहीतरी नवीन घेऊन येणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती. सुरुवातीला नागराज आणि रितेशच्या चाहत्यांना असं वाटलं की रितेश पुन्हा एकदा मराठीत नवा सिनेमा घेऊन येतो की काय. रितेशचे चाहते त्याची वाट पाहत होते. पण या जोडीने शॉर्ट फिल्म या आजच्या लोकप्रिय माध्यमातून तार नावाची कथा मांडायचं ठरवलं. या शॉर्ट फिल्मचा टीजर रिलीज झाला असून त्यामध्ये नागराज पोस्टमनच्या खाकी लुकमध्ये दिसत आहे.



नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून जितका कल्पक आहे तितकाच त्याचा अभिनय देखील सहजसुंदर असल्याचे यापूर्वी आपण पाहिले आहे. नाळ या सिनेमात त्याने सर्वसामान्य कुटुंबातील वडिलांची भूमिका उत्तम निभावली होती. तसेच द सायलेन्स या सिनेमातही नागराजचा अभिनय भाव खाऊन गेला होता. फॅन्ड्री, पिस्तुल्या या सिनेमातून नेहमीच वेगळे कथानक मांडणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या सैराटने कोट्यवधींचा गल्ला बॉक्सऑफिसवर जमवला. या सिनेमातही त्याची छोटीशी भूमिका होती. रितेश देशमुख याच्या मुंबई फिल्म्स या बॅनरखाली ही शॉर्टफिल्म तयार होत आहे. अर्थात तार घेऊन येणारा नागराज पडद्यावर दिसण्यासाठी पुढचं वर्ष उद्या उजाडणार असलं तरी आतापासूनच त्याविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.