Women’s Premier League 2023 : वीमेन्स प्रीमियर लीगच्या लिलावानंतर या स्पर्धेचं वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाला चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर मुंबई आणि गुजरातमध्ये पहिला सामना रंगणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना बेब्रोन स्टेडिअमवर 26 मार्च रोजी रंगणार आहे. बीसीसीआयनं जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, चार डबल हेडर सामने असणार आहेत. पाच संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 


चार डबल हेडर सामने होणार - 


महिला आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामात पाच संघाचा सहभाग आहे. साखळी फेरीत 20 सामने होतील तर 2 प्लेऑफ सामने खेळवले जाणार आहे. 23 दिवसांपर्यंत महिला आयपीएलचा थरार रंगणार आहे. यात चार डबल हेडर सामने होणार आहे. पहिला डबल हेडर सामना पाच मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर 18,20 आणि 21 मार्च रोजी डबल हेडर सामने होणार आहेत. डबल हेडर स्पर्धेत साडेतीन वाजता पहिला सामना सुरु होणार आहे तर दुसरा सामना सायंकाळी साडेसात वाजता रंगणार आहे. 






पाच संघात रंगणार स्पर्धा -


वीमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात पाच संघ असतील... या पाच संघामध्ये मुंबई इंडियन्स, गुजरात जाएंट्स, यूपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिट्लस या संघाचा सहभाग असेल. सोमवारी महिला आयपीएलसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली होती. या लिलावात 87 खेळाडूंना पाच संघांनी खरेदी केले. भारताकडून स्मृती मंधाना सर्वात महागडी खेळाडू राहिली. आरसीबीने स्मृतीला 3.40 कोटी रुपयात खरेदी केले. महिला आयपीएलच्या लिलावात अष्टपैलू खेळाडूंवर सर्वाधिक पैसे खर्च करण्यात आले. 


अष्टपैलू खेळाडूंवर पैशांचा वर्षाव -


1. एश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया अष्टपैलू): 3.20 कोटी रुपये (गुजरात जायंट्स)
2. नताली सिवर ( इंग्लंड अष्टपैलू): 3.20 कोटी रुपये (मुंबई इंडियन्स)
3. दीप्ती शर्मा (भारत अष्टपैलू): 2.60 कोटी रुपये (यूपी वारियर्स)
4. पूजा वस्त्रकार (भारत अष्टपैलू): 1.90 कोटी रुपये (मुंबई इंडियंस)
5. सोफी एकलस्टोन (इंग्लंड अष्टपैलू): 1.80 कोटी रुपये (यूपी वारियर्स)
6. हरमनप्रीत कौर (भारत अष्टपैलू): 1.80 कोटी रुपये (मुंबई इंडियन्स)
7. एलिसी पैरी (ऑस्ट्रेलिया अष्टपैलू): 1.70 कोटी रुपये (रॉयल चैलेंजर्स बेंगलोर)
8. मारीजाने काप (दक्षिण अफ्रिकी अष्टपैलू): 1.50 कोटी रुपये (दिल्ली कॅपिटल्स)
9. ताहिला मॅक्ग्रा (ऑस्ट्रेलिया अष्टपैलू): 1.40 कोटी रुपये (यूपी वारियर्स)
10. देविका वैद्य (भारत अष्टपैलू): 1.40 कोटी रुपये (यूपी वारियर्स)
11. एमिलिया कैर (न्यूझीलंड अष्टपैलू): 1 कोटी रुपये (मुंबई इंडियन्स) 


आणखी वाचा :
मराठमोळ्या स्मृतीवर कोट्यवधींची बोली, विराटच्या आरसीबीनं घेतलं ताफ्यात
अंडर-19 विश्वचषक जिंकणारी कॅप्टन शेफाली वर्मा दिल्लीच्या ताफ्यात, किती रुपयांना केलं खरेदी?