Women's IPL Auction 2023 : वीमेन्स प्रीमियर लीगच्या (WPL 2023) लिलावात मराठमोळ्या स्मृती मानधनावर कोट्यवधींचा पाऊस पडला आहे. पहिल्या वहिल्या महिला आयपीएलच्या लिलावात आतापर्यंतच स्मृती सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. स्मृतीला आरसीबीनं 3.40 कोटी रुपयांत विकत घेतलं आहे. 50 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर स्मृतीसाठी बोली सुरु झाली होती. मुंबई आणि आरसीबी या संघांनी स्मृतीसाठी बोली लावली होती. पण अखेर आरसीबीनं 3.40 कोटी रुपयांत तिला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. स्मृतीनेही तात्काळ ट्वीट करत प्रतिसाद दिलाय.. स्मृतीने नमस्कार बेंगलोर असं ट्वीट केलेय.. त्यावर आरसीबीनं नमस्कार स्मृती असा रिप्लाय दिलाय. 






 


विराटचं स्वप्न स्मृती पूर्ण करणार का?


आयपीएलमध्ये आरसीबीला आतापर्यंत एकही जेतेपद जिंकता आलेलं नाही. आता महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने अनेक दिग्गज खेळाडूंना संघात घेतलं आहे. यासह आरसीबीने जेतेपदाची तयारी सुरु केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वातही आरसीबीला जेतेपद जिंकता आलं नव्हतं. विराट कोहलीनं अनेकदा ही खंत बोलून दाखवली होती. आता विराट कोहलीचं स्वप्न स्मृती पूर्ण करणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. विराट कोहली आणि स्मृतीच्या टी शर्टवर 18 हा सारखाच क्रमांक आहे. 


स्मृतीकडे कर्णधारपद येणार ?


स्मृतीला आरसीबीने खरेदी केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत असलेल्या महिला संघाने  केलेल्या जल्लोषाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आरसीबीने हा व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये 18 कनेक्शन असं लिहिलेय. आरसीबी स्मृतीकडे संघाची धुरा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरसीबीने आपल्या संघात अनेक दिग्गज फलंदाज आणि गोलंदाजासह अष्टपैलू खेळाडूंना स्थान दिलेय. 














 


स्मृतीचा अनुभव -


जगातील सर्वोत्तम टी20 फलंदाजापैकी स्मृती एक आहे. भारतासाठी ती सलामीची भूमिका पार पाडते, त्याशिवाय ती संघाची उपकर्णधार आहे. स्मृतीने आतापर्यंत 100 पेक्षा जास्त टी 20 सामने खेळले आहेत. स्मृतीच्या अनुभवाचा फायदा आरसीबीला होईल. स्मृतीने 112 टी 20 सामन्यात 2650 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये 20 अर्धशतकांचा समावेश आहे.  भारताची ती आघाडीची फलंदाज आहे. 
 


एलिस पेरीही आरसीबीच्या ताफ्यात - 


स्मृतीशिवाय आरसीबीने एलिस पेरीला 1.70 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. तर न्यूझीलंडच्या डिवाइन सोफीला 50 लाखांच्या बेस प्राइजवर विकत घेतलं आहे. त्याशिवाय भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंह हिला आरसीबीने 1.60 कोटींना खरेदी केले आहे.