Women's t20 challenge 2020  : वुमन टी-20 चॅलेंज क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ट्रेलब्लेझर्सने संघाने सुपरनोव्हाजवर 16 धावांनी विजय मिळवला. ट्रेलब्लेझर्स संघाने पिहल्यांदाचं महिला चॅलेंज ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेवर आपले नाव कोरलं. 2018 आणि 2019 मध्ये वुमन टी-20 चॅलेंज क्रिकेट स्पर्धा जिकणाऱ्या सुपरनोव्हासची यंदा विजयाची हॅटट्रिक हुकली.


शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात स्मृती मंधानाच्या नेतृत्वात ट्रेलब्लेझर्सने हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाससमोर 20 षटकांत 119 धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार स्मृती मंधानाने 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 49 चेंडूंत 68 धावा केल्या. तर सलामीची सहकारी ड्रियांड्रा डॉटिननेही स्मृतीली चांगली साथ दिली. या दोंघींनंतर राधाच्या फिरकीपुढे ट्रेलब्लेझर्सच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. चार षटकांत अवघ्या 16 धावा देत राधाने पाच बळी मिळवले. राधाने डावाच्या अखेरच्या 20व्या षटकात तीन फलंदाज बाद केले.


विजयासाठी 119 धावांचे लक्ष्य गाठताना सुपरनोव्हाजचा संघ 20 षटकांत 7 बाद 102 धावाचं करू शकला. सुपरनोव्हाजची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 30 धावा केल्या. ट्रेलब्लेझर्सच्या दीप्ती शर्मा आणि सलमा खातून या फिरकीपटूंपुढे सुपरनोव्हाजच्या एकाही फलंदाजाचा टिकाव लागला नाही.


दरम्याम अंतिम सामन्यात राधा यादवने यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी करताना पाच बळी मिळवले. या स्पर्धेत एकूण 8 बळी घेत ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तर स्मृती मंधानाने तीन सामन्यांत 107 धावा फटकावत यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान मिळवले.