Ramandeep Singh IPL 2022 : मुंबई आणि कोलकातामध्ये नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअममध्ये सामना रंगलाय. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने संघात एक बदल केला. दुखापतग्रस्त सूर्यकुमारच्या जागी युवा रमणदीप सिंहला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. सूर्यकुमारच्या जागी खेळणारा हा रमणदीप सिंह नेमका आहे तरी कोण?


दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादवच्या जागी मुंबईने रमणदीप सिंहला स्थान दिले. आयपीएलआधी झालेल्या लिलावात मुंबईने रमणदीपला 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीमध्ये खरेदी केलेय. रमणदीप हा मूळचा पंजाबमधील चंदीगढ येथील आहे. मधल्या फळीत फलंदाजी करणारा रमणदीप सिंह स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाब संघाचा सदस्य आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. रमणदीपचा हा आयपीएलचा दुसरा सामना आहे. 9 एप्रिल 2022 रोजी पुण्याच्या मैदानावर रमणदीप सिंहने आरसीबीविरोधात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. 


रमणदीप उजव्या हाताने फलंदाजीसोबत गोलंदाजीही करतो. त्याला बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून मुंबईने आपल्या संघात स्थान दिलेय. 13 एप्रिल 1997 रोजी पंजाबमधील चंदीगढमध्ये रमणदीपचा जन्म झाला. जानेवारी 2017 मध्ये हरियाणाविरोधात पंजाबकडून टी 20  क्रिकेटमध्ये पदार्पण केलेय. आतापर्यंत खेळलेल्या 13 टी 20 सामन्यात रमणदीपने 14 च्या सरासरीने आणि 136.11 च्या स्ट्राईक रेटने 98 धावा काढल्या आहेत. फर्स्ट क्लासच्या दोन सामन्यात 41 च्या सरासरीने त्याने 124 धावा चोपल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 10 सामन्यात 141 धावा केल्या आहेत. 11 टी सामन्यात रमणदीपच्या नावावर तीन विकेट आहेत. 


आज कोलकात्याशी भिडणार मुंबईचा संघ
आज मुंबईचा संघ कोलकात्याशी त्यांचा बारावा सामना खेळणार आहे. यंदाच्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईच्या संघानं 11 सामने सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. तर, नऊ सामने गमावले आहेत. आजच्या सामन्यात मुंबईचा संघ सन्मान वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर, प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याचा संघ मुंबईशी भिडणार आहे. यासामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या रुपात मुंबईच्या चाहत्यांना निराश करणारी माहिती समोर आलीय. 


हे देखील वाचा-