India Head Coach : आगामी टी20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड भारतीय खेळाडूंना शिकवणी देणार नाहीत. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून नव्या हेड कोचचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी 27 मे 2024 पर्यंत अर्ज दाखल करण्याची तारीख आहे. अनेक इच्छुकांनी अर्ज केले असतील, बीसीसीआयकडूनही काही दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलेय. टीम इंडियाचा हेड कोच निवडण्यात धोनी मोठी भूमिका पार पाडणार आहे. बीसीसीआयने धोनीकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अनेक दावेदारांची नावे समोर आलेली आहेत. पण अद्याप नव्या कोचची निवड झालेली नाही, अथवा माहितीही समोर आलेली नाही. भारतीय संघाचा हेड कोच निवडण्यात माजी कर्णधार एमएस धोनी महत्वाची भूमिका बजावणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविडच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग याच्यासाठी बीसीसीआयने सुत्रे हलवली आहेत. फ्लेमिंगने हेड कोचसाठी अर्ज करण्यास नकार दिला, त्याने बीसीसीआयची ऑफर नाकारली. आता फ्लेमिंग याला पटवण्याची जबाबदारी बीसीसीआयने धोनीवर सोपवली आहे.
स्टीफन फ्लेमिंग याची समजूत काढण्यात एमएस धोनीला यश आल्यास, तो टीम इंडियाचा मुख्य कोच होणार हे जवळपास निश्चित आहे. धोनी आणि फ्लेमिंग यांच्यातील बाँड जगजाहीर आहे. दोघांमध्ये चांगली मैत्रीही आहे. 16 वर्षांपासून हे दोघे एकाच संघासाठी काम करत आहेत. त्यामुळे दोघांमध्ये चांगलं बाँडिंग आहे. 2008 आयपीएलमध्ये स्टीफन फ्लेमिंग हा चेन्नईचा सदस्य होता. त्यानंतर तो प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहे.
एमएस धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग या जोडगोळीच्या नेतृत्वात चेन्नईने शानदार कामगिरी केली. चेन्नईने पाच वेळा चषकावर नाव कोरले. चेन्नईच्या यशात धोनीसारखाच फ्लेमिंगचा वाटाही आहे. त्यामुळेच बीसीसीआयने फ्लेमिंगसाठी फिल्डिंग लावली आहे. धोनी फ्लेमिंगची समजूत काढण्यात यशस्वी होईल का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
फ्लेमिंग चेन्नई सुपर किंग्सशिवाय इतर संघाचा कोच म्हणूनही काम पाहत आहे. टेक्सास सुपर किंग्स, जोहान्सबर्ग सुपर किंग्स आणि सदर्न ब्रेव्हचे या संघाचे प्रशिक्षक म्हणून फ्लेमिंग काम पाहत आहे. जर तो बीसीसीआयचा कोच झाल्यास त्याला सर्व कोचिंग सोडावी लागेल.