West Indies New Captain : वेस्ट विंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि मर्यादित षटकाचा कर्णधार कायरन पोलार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पोलार्ड हा संघाचा कर्णधारही असल्याने आता त्याची जागा कोण घेणार? हा प्रश्न सर्वांसमोर होता, अशामध्ये आता संघाचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनला ही जबाबदारी देण्यात आल्याचं नुकतचं समोर आलं आहे. ANI या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आणि टी20 संघाचा कर्णधार निकोलस पूरन असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


 


पोलार्डने अचानक घेतली निवृत्ती


पोलार्डने सोशल मीडियावर माहिती देत निवृत्ती घेतली. त्याने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, "10 वर्षांचा होतो तेव्हापासून वेस्टविंडिज संघात खेळण्याचे माझं स्वप्न होतं. 15 वर्षांपासून टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांत मी वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करत आहे. पण, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवीन खेळाडूंना संघात नक्कीच जागा होण्याचा मार्ग मोकळा होईल. " सध्या पोलार्ड आणि पूरन दोघेही भारतामध्ये सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत व्यस्त आहे. पोलार्ड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून तर पूरन सनरायजर्स हैदराबादमधून खेळत आहे.


निकोलस पूरनची कारकिर्द


निकोलसच्या कारकिर्दीचा विचार करता त्याने एक यष्टीरक्षक फलंदाजासह फिनिशरची भूमिका संघासाठी निभावली आहे. त्याने 37 एकदिवसीय सामन्यात एक शतक आणि आठ अर्धशतकांसह 1121 धावा केल्या आहेत. तर 57 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात आठ अर्धशतकांसह 1193 धावा केल्या आहेत. त्याच्या संपूर्ण टी20 कारकिर्दीचा विचार करता निकोलसने 226 सामन्यात 4474 धावा केल्या असून त्याने एक शतक आणि 24 अर्धशतकं ठोकली आहेत. नाबाद 100 धावा हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.


 हे देखील वाचा-