Jasprit Bumrah Yorker IPL : मुंबई इंडियन्सने अखेर आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. शनिवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबईने दिल्लीचा (MI vs DC IPL 2024) 29 धावांनी पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 234 धावांचा डोंगर उभरला. प्रत्युत्तरदाखल दिल्लीचा संघ 205 धावांपर्यंत मजल मारु शकला. मुंबईच्या विजयामध्ये जसप्रीत बुमराहची भूमिकाही मोठी होती. बुमराहने भेदक मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. बुमराहने धोकादायक ठरु पाहणाऱ्या पृथ्वी याचा त्रिफाळा उडवला. जसप्रीत बुमराहच्या भेदक यॉर्करपुढे पृथ्वी शॉ धाराशियी पडला. बुमराहने अतिवेगानं टाकलेला चेंडू कळायच्या आतच पृथ्वीचा त्रिफाळा उडाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


जसप्रीत बुमराहने 12 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पृथ्वी शॉ याचा त्रिफाळा उडवला. जसप्रीत बुमराहने टाकलेला यॉर्कर अचूक आणि वेगवान होता. चेंडू समजण्याआधीच पृथ्वीच्या दांड्या गुल झाल्या होत्या. बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ओली पोपला अशाच धारदार यॉर्करवर बाद केले होते. आता बुमराहने आयपीएलमध्ये फेकलेल्या या चेंडूचे खूप कौतुक होत आहे. त्याचा व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 






जसप्रीत बुमराहचा भेदक मारा - 


वानखेडेवर मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामना हायस्कोरिंग झाला. या सामन्यात मुंबईने 234 धावांचा डोंगर उभारला. तर दिल्लीने प्रत्युत्तर शानदार टक्कर दिली. दिल्ली 205 धावांपर्यंत पोहचली होती. एकवेळ दिल्ली सामना जिंकणार असेच वाटले होते. पण जसप्रीतच्या भेदक माऱ्यामुळे दिल्लीचा पराभव झाला. मुंबईविरोधात जसप्रीत बुमराहने चार षटकात फक्त 22 धावा देत दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. गोलंदाजाला 10 पेक्षा जास्त सरासरीने चोपला जास्त असताना बुमराहने प्रतिषटक 6 पेक्षा कमी धावा दिल्या. बुमराहने अचूक आणि वेगवान यॉर्कर फेकत जम बसेलल्या पृथ्वीला तंबूत पाठवलं. बुमराहने फेकलेला यॉर्कर गोळीच्या वेगाने आला अन् थेट स्टंपवर आदळला. 






पृथ्वीची शानदार फलंदाजी - 


235 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात हवीतशी झाली नाही. सलामी फलंदाज डेविड वॉर्नर पुन्हा एकदा स्वस्तात परतला. पण दुसऱ्या बाजूला असणाऱ्या पृथ्वीने मात्र वादळी फलंदाजी केली. पृथ्वी शॉ  याने 40 चेंडूमध्ये 66 धावांची खेळी केली. यामध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.