Vivrant Sharma Fifty : आयपीएल 2023 (IPL 2023) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण, या सामन्यात एका युवा खेळाडूनं सर्वांचं लक्ष वेधलं. हैदराबादच्या (SRH) या 23 वर्षीय खेळाडूनं आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी करत सर्वांनाच चकित केलं. आयपीएल 2023 मधील सनरायझर्स हैदराबाद संघाच्या शेवटच्या साखळी सामन्यात जम्मू-काश्मीरचा युवा खेळाडू विव्रंत शर्मानं (Vivrant Sharma) चमकदार कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले. 


पदार्पणाच्या सामन्यातच झळकावलं अर्धशतक


मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (MI) सामन्यात डावखुरा फलंदाज ( Left-handed Batting) विव्रंतला त्याच्या आयपीएल कारकिर्दीमधील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं. सलामीला उतरलेल्या या युवा खेळाडूने अवघ्या 36 चेंडूत आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. विव्रंतने 47 चेंडूत 69 धावा केल्या. यामध्ये नऊ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.


तब्बल 15 वर्ष जुना विक्रम मोडला; युवा खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी


विव्रंत शर्मानं इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पणाच्या सामन्यातचं शानदार अर्धशतकी खेळी करत नवा विक्रम रचला आहे. आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विव्रंतने स्वत:च्या नावे केला आहे. याआधी हा विक्रम स्वप्नील अस्नोडकर या खेळाडूच्या नावे होता. तब्बल 15 वर्ष जुना विक्रम मोडत विव्रंतने नवा विक्रम नोंदवला आहे.


पहिल्या आयपीएल सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज



  • 69 : विव्रत शर्मा (हैदराबाद विरुद्ध मुंबई), मुंबई, 2023

  • 60 : स्वप्नील अस्नोडकर (राजस्थान विरुद्ध कोलकाता), जयपूर, 2008

  • 58* : गौतम गंभीर (दिल्ली विरुद्ध राजस्थान) दिल्ली, 2008

  • 56 : देवदत्त पडिक्कल (बंगळुरु विरुद्ध हैदराबाद) दुबई, 2023


कोण आहे विव्रांत शर्मा?


23 वर्षीय विव्रांत डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज असल्याने एक दमदार अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने 2021 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिन्ही स्वरूपाचे क्रिकेट सामने खेळले आहेत. विव्रांतने आतापर्यंत खेळलेल्या नऊ टी-20 सामन्यांमध्ये 128.18 च्या स्ट्राइक रेटने 191 धावा केल्या आहेत, यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत, त्याने तीन डावात सहा विकेट घेतल्या असून 13 धावांत चार विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. विव्रांतने 14 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 519 धावा केल्या आहेत, यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने आठ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये 22 धावांत चार विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. दोन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 76 धावा केल्या आहेत आणि एक विकेट घेतली आहे.


शेवटच्या लीग सामन्यात मिळाली पदार्पणाची संधी


यंदाच्या आयपीएल हंगामात हैदराबाद संघानं जम्मू-काश्मीरचा खेळाडू विव्रांत शर्मा (Vivrant Sharma) ला संघांत सामील केलं. आयपीएल 2022 च्या लिलावात हा अनकॅप्ड खेळाडू करोडपती झाला. विव्रांतला सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने 2.60 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. पण त्याला आयपीएलमधील पहिला सामना खेळण्याची संधी फार उशीरा मिळाली. यंदाच्या हंगामाच्या हैदराबादच्या शेवटच्या लीग सामन्यात मिळालेल्या या संधीचं विव्रांतने सोनं केलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


टीम इंडियाला मिळाला नवा यॉर्कर किंग, IPL मध्ये चमकला 'हा' खेळाडू; घेऊ शकतो बुमराहची जागा