IPL 2023 Mini Auction: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतून नेहमीच युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ दिले जात असल्याचे आपण पाहिले आहे. अनेक वेळा नवीन पण टॅलेंटेड खेळाडूंना चांगले पैसेही मिळाले आहेत. जवळपास प्रत्येक लिलावात असे एक-दोन खेळाडू असतात ज्यांना लिलावापूर्वी फार कमी लोक ओळखत असतात, पण त्यांना लिलावात मोठी रक्कम मिळते आणि ते रातोरात प्रसिद्ध होतात. यंदाही जम्मू-काश्मीरचा विव्रांत शर्मा (Vivrant Sharma) नावाचा खेळाडू सर्वांच्या नजरेत आला आहे. हा अनकॅप्ड खेळाडू करोडपती झाला असून 2.60 कोटींना त्याला सनरायझर्स हैदराबादने (SRH) विकत घेतलं आहे. तर विव्रांत शर्माबद्दल खास माहिती जाणून घेऊ...


विव्रांतसाठी पहिली बोली कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) लावण्यात आली आणि त्यानंतर सनरायझर्स हैदराबादनेही बोली लावली. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती आणि दोन कोटींची बोली ओलांडूनही कोणीही मागे हटायला तयार नव्हते. पण कोलकाता संघाकडे सनरायझर्सपेक्षा कमी पैसे होते, त्यामुळे अखेरी त्यांनी माघार घेतली. ज्यामुळे विव्रांत 2.60 कोटी रुपयांमध्ये हैदराबाद संघात सामिल झाला.


2021 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण


23 वर्षीय विव्रांत डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज असल्याने एक दमदार अष्टपैलू होऊ शकतो. त्याने 2021 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आत्तापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिन्ही स्वरूपाचे क्रिकेट खेळले आहे. विव्रांतने आतापर्यंत खेळलेल्या नऊ टी-20 सामन्यांमध्ये 128.18 च्या स्ट्राइक रेटने 191 धावा केल्या आहेत ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत, त्याने तीन डावात सहा विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये 13 धावांत चार विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. विव्रांतने 14 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 519 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने आठ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये 22 धावांत चार विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. दोन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 76 धावा केल्या आहेत आणि एक विकेट घेतली आहे.


सॅम करन इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू


या लिलावात इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला पंजाब किंग्जने तब्बल 18.50 कोटी रुपयांना सामील करून घेतले आहे. करनला दुखापतीमुळे लीगच्या मागील हंगामाला मुकावे लागले होते, मात्र या मोसमात तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. करनला विकत घेण्यासाठी त्याच्या दोन जुन्या संघ पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये चांगलीच लढत रंगली, ज्यामध्ये पंजाबने बाजी मारली. यासह करन हा या लीगमध्ये सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडूही ठरला आहे.


हे देखील वाचा-