T20 World Cup 2024 : भारताला टी20 विश्वचषक जिंकायचा असेल, तर सर्वात अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आपली कामगिरी आणखी उंचवावी लागणार आहे. 2 जून पासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होत आहे. दोघांचं वय पाहाता, ही त्यांना अखेरची संधी असेल. रोहित शर्मा 37 तर विराट कोहली 35 वर्षांचा आहे. पुढील विश्वचषकावेळी ते संघात असतील की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे विश्वविजेता होण्याची अखेरची संधी असेल. त्यासाठी दोघांनाही आपल्या खेळामध्ये काही बदल करावा लागणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपला खेळ उंचावला तर नक्कीच भारत पुन्हा एकदा टी20 चषक उंचावेल. 


विराट कोहलीला स्ट्राइक रेट आणखी वाढवावा लागेल  -


विस्फोटक फलंदाजी, पॉवर हिटिंग..ही टी20 क्रिकेटसाठी आता महत्वाचं झालेय. जबरदस्त टायमिंग, पॉवर हिटिंग अन् मोठी खेळी करण्याचं कौशल्य.. याचं ज्या खेळाडूकडे अचूक मिश्रण आहे, तोच टी20 क्रिकेटमध्ये राज करु शकतो. भारताच्या सर्वात अनुभवी खेळाडूमध्ये विराट कोहलीचं नाव घेतलं जातं. कोहलीने आतापर्यंत 117 टी20 सामने खेळले आहेत. विराट कोहलीने 52 च्या सरासरीने 4037 धावांचा पाऊस पाडलाय. सर्वात छोट्या क्रिकेटच्या प्रकारात विराट कोहलीचा स्ट्राईक रेट 138 इतकाच आहे. त्यामुळे विराट कोहलीला स्ट्राईक रेटमध्ये सुधारणा करावी लागेल. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीने जबदस्त स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली, वर्ल्डकपमध्येही तो शानदार फलंदाजी करेल, यात शंकाच नाही. 


खेळपट्टी चांगली असेल तर टी20 क्रिकेटमध्ये 250 धावांचा बचाव करणं कठीण आहे. आशा स्थितीमध्ये विराट कोहली फक्त 140 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत असेल तर भारतीय संघ 250 धावांचा पाठलाग कसा करणार... वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंड या संघाकडे पॉवर हिटर आहेत. विराट कोहलीकडे मोठी खेळी करण्याची क्षमता आहे, पण त्याला स्ट्राईक रेटही वाढवावा लागले. अन्यथा भारताचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहू शकते. विराट कोहली भारतीय फलंदाजीचा कणा आहे, त्यामुळे कोहलीकडून मोठ्या आणि आक्रमक खेळीची अपेक्षा असेलच.


रोहित शर्माला अतिआक्रमक होण्याची गरज नाही - 


2023 वनडे विश्वचषकात प्रत्येक सामन्यात रोहित शर्मानं अतिआक्रमक फलंदाजी केली. पण फायनलमध्ये रोहित शर्माचा अतिआक्रमक स्वभाव भारतीय संघाला भारी पडला. ऑस्ट्रेलियाविरोधात फायनलमध्ये रोहित शर्माने 10 व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर 10 धावा चोपल्या होत्या. त्यानंतरही चौथ्या चेंडूवर रोहित शर्माने मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट फेकली. फायनलमध्ये रोहित शर्मानं 47 धावांची खेळी केली... पण रोहित बाद झाल्यानंतर ठरावीक अंतराने भारतीय संघाने विकेट फेकल्या. आता टी20 विश्वचषकात रोहित शर्माला अतिआक्रमक फलंदाजीला लगाम घालावा लागेल. आयपीएलमध्येही रोहित शर्माने अतिआक्रमक फलंदाजी केली. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याशिवाय फटक्यावर त्याचं नियंत्रण नसल्याचेही दिसले.  टी20 विश्वचषकात रोहित शर्माने अनावश्यक फटके मारण्यापासून स्वत:ला थांबवावे.