Vaibhav Suryavanshi : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले होते. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी वैभवला राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाख रुपयांना खरेदी केले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती. सीझन सुरू होण्यापूर्वी राहुल द्रविड यांनीही वैभव डेब्यू करू शकतो, असे संकेत दिले होते. मात्र, वैभव सूर्यवंशील वयाच्या 13 व्या वर्षी पदार्पणाची संधी मिळणार नाही, हे निश्चित मानले जात आहे.
कोण आहे वैभव सूर्यवंशी? (Who Is Vaibhav Suryavanshi)
वैभव सूर्यवंशी नाव मराठी वाटतं असलं तरी तो मराठी नाहीये. तो बिहारमधील आहे. बिहारमधील एका छोट्याशा खेड्यात राहणारा वैभव सूर्यवंशी हा भारतातील सर्वात कमी वयात क्रिकेट जगतात एक वेगळी ओळख निर्माण करणारा खेळाडू बनलाय. वैभवचा जन्म 27 मार्च 2011 रोजी बिहारमधील ताजपूर गावात झालाय. वैभवने वयाच्या अवघ्या 4 थ्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. वैभवच्या वडिलांचे नाव संजीव असून ते शेतकरी आहेत, त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी मोठी मेहनत घेतलीये. वैभव जेव्हा 9 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला जवळच्या समस्तीपूर येथील क्रिकेट अकादमीत दाखल केले होते. मुलाच्या क्रिकेटसाठी वडिलांना जमीन सुद्धा विकावी लागली होती.
राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत. यामध्ये वैभवला संधी मिळाली नाही. आता वैभव 14 वर्षांचा आहे. 27 मार्च रोजी त्यांचा वाढदिवस आहे. याच कारणामुळे वयाच्या 13 व्या वर्षी पदार्पण करण्याच्या त्याच्या आशा संपल्या आहेत. वैभवचा जन्म 2011 साली झाला. त्याच वर्षी जेव्हा भारताने 28 वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पहिल्या तीन सामन्यांमध्ये संघाचा भाग नाही. त्यामुळे वैभवला संधी मिळेल, असं बोललं जात होतं. दरम्यान, या संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर संघाने गुणतालिकेत तळ गाठला आहे. 23 मार्च रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) त्यांचा 44 धावांनी पराभव केला. 27 मार्च रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) राजस्थानचा 8 गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. हा सामना 30 मार्च रोजी गुवाहाटी येथे होणार आहे. या सामन्यासाठी संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो.
राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू बनला. बिहारकडून खेळणारा वैभव हा सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. वैभवला 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघाविरुद्ध भारतीय संघात त्याने स्थान मिळवले होते. त्याने अवघ्या 58 चेंडूत शतक झळकावून एक नवा विक्रम रचला होता. वैभवने भारतीय अंडर-19 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक झळकावले होते.
इतर महत्वाच्या बातम्या