IPL RCB vs CSK: आज झालेल्या चेन्नई विरुद्ध बंगलोर सामन्यात बंगलोर एक्सप्रेस सुसाट धावून त्यांनी नावाजलेल्या चेन्नई एक्सप्रेस ला ब्रेक लावला...हे ब्रेक लावण्याचे काम सुरवातीला चेन्नई च्या क्षेत्ररक्षकांनी आणि नंतर बंगलोर मधील गोलंदाजी ने केले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्यामागे त्यांचा मागील अनुभव काही ही असु दे..पण याच चेन्नई मध्ये कधी कधी चांगले स्विंग करणारे गोलंदाज घातकी ठरतात हा सुद्धा इतिहास आहे..अशी किमया कधी तरी चेन्नईकडून दीपक चाहर ने आणि कधी तरी तुषार देशपांडेने सुद्धा केली आहे.. ज्यांच्या गोलंदाजीच्या ऍक्शन मध्ये काव्य आहे असे वेगवान गोलंदाज फार कमी आहेत...आणि हेझलवूड तशा प्रकारचा गोलंदाज आहे जो कधी तरी शॉन पोलॉक च्या शाळेचा विद्यार्थी वाटतो..१९७ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या चेन्नई संघाला आपल्या पहिल्याच षटकात २ महत्वाचे बळी घेऊन हेझलवूड ने बॅक फूट वर ढकलले..त्यातून ते शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत..या मधे बंगलोर संघाचा कर्णधार रजत पाटीदार चे कौतुक करावे लागेल..भुवनेश्वर कडून सलग ३ रे षटक टाकण्याचा निर्णय फायदेशीर ठरला अर्थात कर्णधार म्हणून त्याने घेतलेल्या रिव्ह्यू चा निर्णय सुद्धा योग्य होता... संपूर्ण सामन्यात रजत ने कर्णधार म्हणून आपली छाप पाडली..त्याने वेगवान गोलंदाजीचा केलेला वापर आणि सुयश शर्मावर टाकलेला विश्वास तो भविष्यातील एक उत्तम कर्णधार होऊ शकतो याची साक्ष देतात...आजच्या सामन्यात बंगलोर संघाकडून १२ षटकार मारले गेले तर चेन्नई संघाकडून फक्त २ आणि हीच बाब निर्णायक ठरून गेली...२०/२० च्या सामन्याचा निकाल हा पावर प्ले मध्ये तुम्ही किती धावा काढता यावरच ठरतो... चेन्नई ने पहिल्या १० षटकात फक्त 65 धावा आणि (४ बळी ) केल्या तेव्हाच या सामन्याचा निकाल काय लागेल हे समजून गेले.धोनी ने अश्विन नंतर येण्याचा निर्णय अनाकलनीय होता..जेव्हा आवश्यक सरासरी १५ वर गेली होती..
बंगलोर संघाकडून फलंदाजीत सॉल्ट ने दिलेल्या आक्रमक सुरवातीनंतर रजत ने केलेली खेळी महत्वाची ठरली...या मधे त्याला ३ जीवदान मिळाले...आज त्याने चेन्नई मध्ये कुठे ही लॉटरी काढली असती तरी विजेता ठरला असता इतका तो नशीब घेऊन खेळत होता...पण तो एक दर्जेदार फलंदाज आहे आणि अर्धशतक करीत असताना त्याने मारलेल्या बॅक फूट कट चा फटका ते सिद्ध करून गेला...चेन्नई कडून नूर ने आणि खलील पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी केली..ही आय पी. एल डावखुरे रिस्ट स्पिनर गाजवितात की काय अशी शंका यावी इतकी सुंदर गोलंदाजी ते करीत आहेत..आज धोनी ने पुन्हा एकदा तो का महान यष्टिरक्षक आहे हे सॉल्ट ला तंबूत धाडून दाखवून दिले...पारंपरिक यष्टीरक्षण करण्याच्या पद्धतीला बगल देऊन त्यांनी स्वतःची अशी शैली निर्माण केली म्हणूनच तो वेगळा आहे आणि म्हणूनच तो महान आहे..खास कौतुक करावे तर भजनपूर येथून आलेल्या सुयश शर्माचे...किती धाडसी गोलंदाजी केली ती सुद्धा समोर दुबे आणि रवींद्र असताना..जेष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी एका मुलाखती मध्ये म्हणाले होते की त्यांचे गुरु(सत्यदेव दुबे) त्यांस म्हणाले की तू मिळेल ती कामे करीत रहा कारण त्यातून तुला पैसे मिळतील आणि त्यातून तुला आत्मविश्वास मिळेल...आपण आय पी एल बद्दल काही जरी बोललो तरी याच आय पी एल ने भारतातील ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंना पैसा दिला त्यातून त्यांना आत्मविश्वास आला ...म्हणून आज आपल्या ला कधी बुमराहा दिसतो..कधी हार्दिक...अगदी कालपर्यंत विघ्नेश पुथुर तर आजच्या सामन्यात सुयश शर्मा....भारतीय क्रिकेट मधील आय पी एल नावाच्या या पट्टराणीने खूप जणांची स्वप्न पुरी केलीत हे मात्र नक्की...